‘जामिया मिलिया’च्या आंदोलक विद्यार्थ्यांचं ट्वीट लाईक, अक्षय कुमार म्हणतो…
मी अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याचं समर्थन करत नाही, अनवधानाने ट्वीट लाईक झालं, असं स्पष्टीकरण अक्षयकुमारने ट्विटरवरुन दिलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारने नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं ट्वीट लाईक (Akshay Kumar Likes Jamia Tweet) केल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अक्षयने आपल्याकडून अनवधानाने हा प्रकार घडल्याचं स्पष्ट केलं आहे.
‘जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या ट्वीटवरील ‘लाईक’बाबत मी सांगू इच्छितो, ते चुकून झालं. मी ट्विटर फीडमध्ये स्क्रोलिंग करत होतो आणि ते (लाईक बटण) चुकून प्रेस झालं असावं. पण जेव्हा मला हे समजलं, तेव्हा मी लगेच ‘अनलाईक’ केलं. कारण मी अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याचं समर्थन करत नाही.’ असं स्पष्टीकरण अक्षयकुमारने ट्विटरवरुन दिलं आहे.
Regarding the ‘like’ on the tweet of Jamia Milia students, it was by mistake. I was scrolling and accidentally it must have been pressed and when I realised I immediately unliked it as In no way do I support such acts.
— Akshay Kumar (@akshaykumar) December 16, 2019
‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात केलेलं ट्वीट अक्षयकुमारने लाईक केल्याचं पाहून त्याचे चाहते बुचकळ्यात पडले होते. अक्षय या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन करतो का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता अक्षयच्या स्पष्टीकरणामुळे या शंका दूर झाल्या आहेत.
Akshay Kumar Likes Jamia Tweet
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. शेकडो विद्यार्थी रविवार संध्याकाळपासून रस्त्यावर उतरल्यानंतर पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. अखेर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढल्याने परिस्थिती चिघळली होती. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत बसची जाळपोळ केली.
जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना दुखापत झाली. त्यानंतर एएमयूच्या विद्यार्थ्यांनी हल्लाबोल केला.
एएमयूच्या विद्यार्थ्यांनी बाबे सर सय्यद गेटवर जमून दिल्लीतील प्रकाराच्या निषेधार्थ कायदा आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी सर्व गेट सील करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. इथेही पोलिसांना अश्रूधूर आणि लाठीचार्जचा वापर करावा लागला. यामध्ये काही पोलिस जखमी झाल्याचीही माहिती आहे.
Akshay Kumar Likes Jamia Tweet