अलमट्टीतून पाणी सोडल्याने 17 गावं विस्थापित, पुराचा आरोप महाराष्ट्रावर
कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती कमी करण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी राज्य सरकारने लावून धरली होती. अखेर हा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीतील फुगवटा कमी झालाय.
बेळगाव : कृष्णा नदीतील फुगवटा कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून (Almatti dam) 5 लाख 70 हजार 991 क्युसेक्सने विसर्ग करण्यात येतोय. यामुळे धरणाखालील (Almatti dam) गावं प्रभावित झाली आहेत. ही गावं आता पूरस्थितीसाठी महाराष्ट्राला दोष देत आहेत. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती कमी करण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी राज्य सरकारने लावून धरली होती. अखेर हा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीतील फुगवटा कमी झालाय.
अलमट्टी धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यादांच विक्रमी असा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बागलकोट तालुक्यातील मुधोर, यलगुर, मसुतीसह 17 गावात पाणी घुसलंय, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. 17 गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. या गावकऱ्यांनी पुरासाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरलंय. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना दिली असती तर आमच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली नसती, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
क्युसेक म्हणजे काय? What is cusec?
नदी, कालव्यातील पाण्याचा प्रवाह (विसर्ग) Cubic feet per second (CuSec) मध्ये मोजला जातो. 1 क्युसेक म्हणजे अंदाजे 28.3 लिटर पाणी. अलमट्टी धरणातून 570991 लाख क्युसेक पाणी सोडलं म्हणजे एका सेकंदाला 1 कोटी 61 लाख 59 हजार 35 लिटर पाणी सोडलेलं असतं.
कसं आहे अलमट्टी धरण?
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बसवाना बागेवाडीमध्ये कृष्णा नदीवर हे धरण आहे. धरणाची उंची वाढण्याचा वादही चांगलाच गाजला होता. 147 गावांची 48 हजार हेक्टर जमीन संपादित करुन या धरणाचं काम करण्यात आलं. 2002 मध्ये धरणाचं काम थांबवावं लागलं. अखेर धरण 2005 मध्ये वापरात आलं. या धरणाची लांबी 1564 मीटर आणि उंची 49.29 मीटर आहे. या धरणाची क्षमता जास्त असली तरी सध्या 110 टीएमसीपर्यंतच पाणी साठवलं जातं. धरणाची पूर्ण संचयपातळी 519.60 मीटर आहे. अलमट्टीला दोन कालवेही आहेत. उजव्या कालव्याचं लाभक्षेत्र 20 हजार 235 हेक्टर, तर डाव्या कालव्याचं लाभक्षेत्र 16 हजार 100 हेक्टर आहे.