डॉक्टरच्या चुकीने हाहा:कार, चुकीच्या इंजेक्शनमुळे 90 जणांना HIV
कराची : पाकिस्तानात एका डॉक्टरच्या चुकीची किंमत तब्बल 90 जणांना भोगावी लागत आहे. एचआयव्ही संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे 65 मुलांसह 90 जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनीच याबाबतची माहिती दिल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे डॉक्टर स्वत:ही एचआयव्ही बाधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिसांनी […]
कराची : पाकिस्तानात एका डॉक्टरच्या चुकीची किंमत तब्बल 90 जणांना भोगावी लागत आहे. एचआयव्ही संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे 65 मुलांसह 90 जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनीच याबाबतची माहिती दिल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे डॉक्टर स्वत:ही एचआयव्ही बाधित असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोग्य विभागाच्या तक्रारीनंतर आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी डॉक्टरही एचआयव्ही बाधित असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे”.
गेल्याच आठवड्यात प्रशासनाला माहिती मिळाली होती, त्यानुसार शहराबाहेरील परिसरात 18 मुलांना एचआयव्हीची बाधा झाली होती. त्यानंतर व्यापक स्तरावर चौकशी झाल्यानंतर या डॉक्टरचा कारनामा समोर आला.
90 जणांमध्ये 65 मुलांचा समावेश
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, “आतापर्यंत 90 जण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची सूचना मिळाली आहे. त्यापैकी 65 तर लहान मुलंच आहेत. हे सर्व एकाच डॉक्टरने केलं आहे. त्या डॉक्टरने एचआयव्ही बाधित सुईने इंजेक्शन दिल्याने हा प्रकार घडला”
सध्या आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत, मात्र 90 जणांना एचआयव्हीची बाधा झाली त्याचं काय, असा प्रश्न आहे. ज्या मुलांना बाधा झाली आहे, त्यांच्या पालकांचीही तपासणी करण्यात आली, मात्र सुदैवाने त्यांना बाधा झालेली नाही.
सध्या पाकिस्तानात एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सचे रुग्ण तुलनेने कमी आहेत. अंमली पदार्थाचे सेवन करणारे, वेश्या व्यवसाय आणि परदेशातून परतलेल्या मजुरांमध्ये एड्सचं प्रमाण अधिक आहे.