BLOG: International Youth Day | जगातील सर्वात तरुण देश आणि त्याच्या समोरील आव्हानं

जागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विविध पैलूवर चर्चा घडवून आणली जाते (International youth day and challenges of India).

BLOG: International Youth Day | जगातील सर्वात तरुण देश आणि त्याच्या समोरील आव्हानं
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 5:08 PM

जागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विविध पैलूवर चर्चा घडवून आणली जाते (International youth day and challenges of India). पोर्तुगाल देशातील लिस्बन येथे ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. 

यावर्षी “Youth Engagement for Global Action” ही थीम  निश्चित करण्यात आली आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था, समाजकारण आणि राजकारण यामध्ये युवांचा सहभाग कसा वाढवता येईल याबाबत यात विशेष प्रयत्न करण्याचा विचार आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय युवकांविषयी देखील विचार होणे गरजेचे आहे. युनायटेड नेशन 2015 च्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतात आहे. सद्यस्थितीत भारताची अर्धी लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे. 2020 मध्ये भारतातील लोकांचे सरासरी वय हे 29 वर्षे असेल तेव्हा जपानमध्ये ते 48 वर्षे असेल हा अंदाज आता खरा ठरतोय. भारतातील 18 ते 28 या गटातील युवकांच्या संख्येची तुलनाच करायची झाली, तर सध्यस्थितीत केवळ भारतातील युवकांची संख्या ही पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

अर्थातच युवा हा भारताचा चेहरा, ताकद आणि भविष्य आहे. उद्याचा भारत कसा असेल हे आजच्या युवकांच्या कामगिरीवर ठरेल. त्यामुळे एक सक्षम आणि सर्व समाजघटकांना न्याय्य असलेला भारत घडवण्यासाठी समाजातील जटिल आणि ज्वलंत अशा विविध समस्यांवर उपाय शोधणे हे आव्हान युवा पिढीसमोर आहे. सोबतचं आपण एके काळी तरुण होतो, याचं म्हातारपणी दुःख वाटू नये, असे उन्नत, समृद्ध व अर्थपूर्ण तारुण्य जगण्याची संधी मिळेन. स्वत:च्या जीवनासाठी आनंददायी प्रयोजन मिळणे आणि सुयोग्य करियर निवडता येणे हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासूनचा इतिहास बघता अनेक टप्प्यावर युवकांनी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडलेली दिसते. स्वातंत्र्यलढ्याचे लोण संपूर्ण भारतात पसरवण्यासाठी पूर्ण देशभरात युवांची मोठी फौज कार्यरत होती. अगदी महात्मा गांधीच्या आंदोलनात अनेक युवांनी अदृश्य इंजिनांची भूमिका बजावली. त्यामुळेच महात्मा गांधी युवकांना ‘Agent For Social Transformation’ म्हणायचे.

पुढे जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात युवकांचे योगदान सर्वपरिचित आहे. जेपींच्या मार्गदर्शनात युवकांनी ‘राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक’ अशा 7 क्रांतीचा विचार केला. जेपींच्या ‘संपूर्ण क्रांती’ या नाऱ्याला प्रतिसाद देत संपूर्ण समाजजीवन ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. ‘मैं धुनी युवकोंके तलाश मैं हु’ असं म्हणणाऱ्या जयप्रकाश नारायण यांच्या या आंदोलनाची विशेषता म्हणजे युवांचा सहभाग फक्त आंदोलनापुरता मर्यादित नव्हता, तर आंदोलनात सहभागी युवकांपैकी अनेकांनी रचनात्मक कामाद्वारे समाजपरिवर्तनाचा वसा पुढे चालू ठेवला आहे. 

अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हटलं तर 2011 मध्ये अण्णा आंदोलन. या काळात झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात युवकांनी मारलेली उडी भारत सरकारला हलवून सोडणारी होती.

70–80 च्या दशकात अनेक तरुण-तरुणींनी सामाजिक कार्यात उडी घेतलेली आपल्याला माहित आहे. त्यावेळचे वातावरण देखील अशा प्रकारच्या निर्णयाला पोषक होते. दरम्यानच्या काळात झालेल्या भांडवलशाहीच्या प्रसारामुळे मात्र आपल्या जीवनाकडे बघण्याचा आजच्या आमच्या युवा पीढीचा दृष्टीकोन खूप बदलला आहे. “अधिकाधिक पैसा कमावणं हेच जणू जगण्याचे एकमेव ध्येय आहे” असा विचार अनेकांच्या मनावर बिंबलेला दिसतो. म्हणून सामाजिक कृती तर दूर पण साध्या संवेदनशीलतेचा देखील अभाव अनेक ठिकाणी जाणवतो. विविध सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान घ्यायला इच्छूक आणि सक्षम असे युवा ‘चेंज मेकर्स’ फारसे नाहीत ही एक मोठीच अडचण आहे. 

सध्या भारताताकडे बघितलं तर भारतासमोर हिमालयाएवढी मोठी आव्हानं आहेत. दुसरीकडे युवकांसमोर ते आव्हान सोडवण्याची संधी देखील आहे. भारताला राष्ट्र म्हणून समृद्ध होण्यासाठी आणि तळागाळातील लोकांच्या न्याय्य विकासासाठी बऱ्याच आव्हानांना सामोर जाण्याची आणि आव्हानांवर ‘टिकून’ काम करु शकेल असा युवांची फळी “निर्माण” करण्याची आज खरी गरज आहे. 

सर्व समाजघटकांच्या न्याय्य विकासासाठी कुठल्या आव्हानांना युवांना सामोरे जाणे गरजेचे.

शेती :

भारतीय शेती प्रचंड मोठ्या संकटातून जात असल्याचे अनेक संदर्भ आपल्यासमोर आहेत. 1995 नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आपण जेव्हा शेतकरी आत्महत्या मोजायला सुरुवात केली, तेव्हापासून भारतात तब्बल 3,50,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच दर 12 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. 

भारतातले 57 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, म्हणजेच भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक आणि यांचा जीडीपीतला वाटा 17 टक्के इतका अन्यायकारक आहे. 

2016 मधील भारत सरकारच्या स्वतःच्या आर्थिक सर्वेक्षणात दिसून आले की, महाराष्ट्रासह इतर 16 राज्यांमधील शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 20,000 रुपये आहे म्हणजेच 1600 रुपये प्रती महिना एवढे कमी. यातून भारतीय शेतकरी आणि शेती प्रचंड मोठ्या अरिष्टातून जात असल्याचं स्पष्ट आहे.

भारतातील शेतकरी आत्महत्या, शेतीतील अमानवीय कष्ट,  शेतीवर होणारा खर्च, शेतीचे उत्पन्न आणि उत्पादकता लक्षात घेता कृषि प्रधान भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कल्पक आणि हुशार युवांना शेतीक्षेत्रात काम करण्याची गरज आहे.

आरोग्य:

दरवर्षी आरोग्यासेवेवरील खर्च न झेपल्यामुळे सुमारे 5 कोटी भारतीय जनता दारिद्र्यरेषेच्या खाली ढकलली जात आहे. सुमारे 5 कोटी! ( मराठवाडा आणि विदर्भ यांची एकूण लोकसंख्या 4.2 कोटी आहे.)

नीती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार भारतात दर 1 लाख प्रसूतीमागे 130 माता मरतात, हेच प्रमाण चीनमध्ये 56 , श्रीलंकेत 60 तर स्वीडनमध्ये 4.4 असं आहे.

भारतातील सरकारी रुग्णालयामध्ये 11 हजार 82 रुग्णांमागे एक डॉक्टर आहे, तर 2 हजार 46 रुग्णांसाठी एक बेड. त्यामुळे 80 टक्के लोकांना परवडत नसले तरी खासगी वैद्यकीय सेवाच घ्यावी लागते.

WHO च्या एका अहवालानुसार राष्ट्रीय आरोग्यावर खर्च करणाऱ्या 175 देशांमध्ये भारताचा क्रमांक 171 लागतो. अफगाणिस्तान, नेपाळ आणि मालदीव हे देशसुद्धा आरोग्यावर आपल्यापेक्षा खूप जास्त पैसा खर्च करतात. यासारख्या अनेक कारणांमुळे भारतातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती दारूण असल्याचे अनेक पुरावे दिवसागणिक समोर येत आहे.

शिक्षण :

2019 पर्यंत भारतात 26 टक्के  लोक अशिक्षित होते. पण उरलेल्या 74 टक्के सुशिक्षित लोकांमध्येही प्राथमिक शाळेतच बाहेर पडलेले 23 टक्के लोक आहेत. 

प्रथम संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या असर सर्वेनुसार यावर्षी पाचवीतील 52 टक्के मुलांना दुसरीसाठीचं पाठ्यपुस्तक वाचता येत नव्हतं आणि 49 टक्के मुलांना 2 अंकांची वजाबाकी जी दुसरीत शिकवतात तीही करता येत नव्हती.  

अमर्त्य सेन यांच्यासारखे तज्ज्ञ सांगतात, की भारत सरकारने अनेक वर्ष जीडीपीच्या किमान 6 टक्के खर्च हा शिक्षणावर करावा, पण 2017 च्या आर्थिक सर्वेक्षणात सिद्ध झालं आहे की भारतात शिक्षणावर 2.7 टक्के एवढा खर्च होतो.

भारतातील शाळेची परिस्थिती, शिक्षकांची संख्या, शिक्षणाची गुणवत्ता लक्षात घेता एकंदरीत शिक्षणव्यवस्थेची परिस्थिती खूपच गंभीर आहे.

विषमता आणि गरिबी :

भारतातल्या आर्थिकदृष्ट्या खालच्या 90 टक्के लोकांकडे भारतातील फक्त 19.3 टक्के संपत्ती आहे. तसेच सर्वात श्रीमंत 1 टक्का लोकांकडे 58.4 टक्के संपत्ती आहे. म्हणजेच खालच्या 90 टक्के लोकांकडे असलेल्या संपत्तीच्या तिप्पट! 

‘अ‍ॅक्शन अगेन्स्ट हंगर च्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये भारतातले 14.5 टक्के लोक भूकेललेले होते. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 119 देशांमध्ये भारताचा नंबर 103 वा आहे. म्हणजेच भारतामागे फक्त पाकिस्तान आणि आफ्रिकेतले असे काही 16 देश आहेत.

सध्या भारतात गेल्या 45 वर्षांतली सगळ्यात जास्त बेकारी आहे. 2011-12 मध्ये ती 2.2 टक्के होती. ती जानेवारी 2019 मध्ये  6.1 टक्क्यावर गेली. खेड्यात तर बेकारी यापेक्षाही जास्त आहे. भारतातली विषमता, गरीबी आणि बेकारी बघता या क्षेत्रात प्रचंड आव्हानं आहेत.

पर्यावरण:

WHO ने सेन्ट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाची 2018 ची आकडेवारी वापरुन काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे जगातल्या सगळ्यात जास्त प्रदूषित 15 शहरांमधील 14 शहरं भारतात होती.

येल विद्यापीठातल्या एका रिपोर्टप्रमाणे एन्व्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताचा नंबर 177 लागतो. एन्व्हायर्नमेंटल हेंल्थमध्ये 177 तर एअर क्लालिटीमध्ये 180 देशांमध्ये भारताचा नंबर 178 लागतो.

साामाजिक आव्हानांशी लढण्यासाठी भारतात तरुणांचे प्रयत्न

वरील सामाजिक प्रश्न आणि समस्या या उदाहरणादाखल घेतल्या आहेत. भारतीय युवांसमोर धार्मिक आणि जातीय तेढ कमी करण्यासारखे अनेक आव्हानं आहेत.

ही आव्हानं मोठी असली तरी यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक कार्यकर्ते भारतात वेगवेगळ्या जागी करताना दिसतात ही आनंदाची बाब आहे. असाच एक प्रयोग सर्च संस्थेच्या माध्यमातून डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने सुरु आहे. “निर्माण” असं या उपक्रमाचं नाव असून सामाजिक क्षेत्रात युवां नेतृत्व घडवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे.

निर्माणची ही शिक्षणप्रक्रिया जून 2006 मध्ये सुरु झाली. आता याला 12 वर्षे होत आहेत. अशा अनेक सामाजिक समस्यांना बघून युवांना हताश होवू न देता, सामाजिक समस्यांविषयी युवांना सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने हे संपूर्ण काम सुरु आहे.

महात्मा गांधींच्या नई तालिम या शिक्षण प्रयोगाला मार्गदर्शक मानून आकार घेत असलेली निर्माण प्रक्रिया युवांच्या आयुष्याला समाजाभिमुख प्रयोजन लाभावे यासाठी प्रयत्नशील आहे.

2006 ते 2020 या काळातल्या निर्माणच्या 10 बॅचेसमध्ये देशभरातील 14000 हून अधिक युवक-युवती सहभागी झाले आहेत. त्यापैकी आज 390 युवक देशभरात कुठला ना कुठला सामाजिक प्रश्न घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. विविध स्वयंसेवी संस्था, दुर्गम भागात शासकीय सेवा, सोशल एंत्रप्रुनरशिप, फेलोशिप्स, इत्यादीच्या माध्यमातून हे युवा कार्यरत आहेत. सोबतच शंभराहून अधिक विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, मार्गदर्शक यांचे एक नेटवर्क उभे राहिले आहे.

निर्माणमधील अनेक युवांनी विविध नामवंत विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. यात जॉन्स हॉपकिन्स, हारवर्ड आणि पेनसिल्वेनिया विद्यापीठ, आय.आय.टी. मुंबई, आय.आय.टी. दिल्ली, आय.आय.टी. कानपूर, यु. डी. सी. टी. मुंबई, इत्यादी संस्थांचा समावेश आहे. आज त्यातील अनेकजण करिअरच्या नेहमीच्या चौकटीच्या बाहेर पडून सामाजिक प्रश्नांवर काम करताहेत. अजून बरीच मजल मारायची बाकी आहे पण आज अनेक लुकलुकते दिवे जागोजागी प्रकाशमान होत आहेत ही आम्हाला अत्यंत सकारात्मक बाब वाटते. 

निर्माणच्या अकराव्या बॅचसाठीची या वर्षीची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. निर्माण शिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी http://nirman.mkcl.org या संकेतस्थळावरील उपलब्ध अर्ज भरुन त्वरित पाठवावा.

इतर प्राण्यांपासून मनुष्याला वेगळे करणारी एक बाब म्हणजे आपले जीवन हे केवळ प्रकृतीवर (Nature) नाही तर संस्कृतीवर (Culture) देखील आधारलेले असणे. याच संस्कृतीचा, त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विज्ञान – तंत्रज्ञानाचा, त्यामुळे झालेल्या भौतिक प्रगतीचा (!), बदललेल्या जीवन ध्येयांचा परामर्श घेऊन युवा पिढी आज काय विचार करते हे प्रथम समजून घ्यायला हवे. पण सोबतच ही भौतिक प्रगतीची प्रक्रिया जास्तीत जास्त सर्वसमावेशक होणे आणि पर्यावरणीयदृष्ट्या समतोल राखणे अत्यावश्यक आहे. आपली संस्कृती ही अधिकाधिक माणसांना अर्थपूर्ण जीवनाची अनुभूती मिळण्यासाठी आणि ‘निव्वळ ग्राहक’ न बनता ‘जागरूक नागरिक’ बनण्यासाठी प्रवृत्त करणारी असणे गरजेचे आहे. ‘निर्माण’ हे त्या दृष्टीने टाकलेले एक पाउल आहे. 

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचा :

कोरोना विरुद्धच्या युध्दात युवकांची भूमिका काय? : डॉ.अभय बंग

BLOG: जीएसटी, गुटखा-खर्राबंदी, आरक्षण हवं की नको यासाठी समीक्षा समिती नेमणार का?

BLOG: तथ्यप्रियता: गडचिरोलीचे नक्षल, कार्ल्याचे कोळी आणि मी – सामान्यीकरणाचा धोका

International youth day and challenges of India

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.