कोरोनाविरुद्ध लढाई, मात्र फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात : गृहमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. याचवरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे (Anil Deshmukh on Devendra Fadnavis and Governor meeting).
जळगाव : एकिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. याचवरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे (Anil Deshmukh on Devendra Fadnavis and Governor meeting). राज्यात सध्या कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.
नागपूर येथून मुंबईला जात असताना मंगळवारी (28 एप्रिल) सायंकाळी ते काही काळ जळगावात थांबले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत धावती आढावा बैठकही घेतली. यात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “कोरोनाच्या परिस्थितीतही देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात. कोरोनाच्या लढाईत जिंकण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. आम्हाला आता राजकारण करायचे नाही.”
कोरोनाच्या लढाईत पोलीस, डॉक्टर्स, नर्स तसेच सफाई कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांचा सरकारला अभिमान आहे. पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला तातडीने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरीही देण्यात येईल, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, “राज्यात अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये, अशी स्थिती राज्य सरकारकडून निर्माण केली जात आहे.” विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळात अनेकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटी घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या :
दुसरा प्रस्ताव दिला, राज्यपाल विचार करतो म्हणाले, आम्ही राजकीय भाष्य करणार नाही : जयंत पाटील
मुख्यमंत्री आणि राज्यपालांची राजभवनात भेट
कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले, कुटुंबियांना मोठा दिलासा
Anil Deshmukh on Devendra Fadnavis and Governor meeting