EXPLAINER : घोषणा केली पण कार्यकर्ते आहेत कुठे? राहुल गांधी ती घोषणा हवेतच विरणार का?
विधानसभा निवडणुका असोत की लोकसभा निवडणुका. निवडणुक जाहीर होईपर्यंत नेते, कार्यकर्ते एसीमध्ये बसून थंड खोलीत विश्रांती घेताना दिसतात. निवडणूक लागली की तेच नेते, कार्यकर्ते सक्रीय होतात आणि निवडणुका संपल्यानंतर पुन्हा सुप्तावस्थेत जातात.
नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दोन वर्षांपूर्वीच लोकसभा निवडणुकांची तयारी करायला सुरवात केली होती. बूथनिहाय कार्यकर्ते तयार करून त्यांना घरोघरी प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यामानाने भाजपला हरविण्यासाठी सरसावलेल्या कॉंग्रेसची परिस्थिती मात्र अगदीच विदारक आहे. राहुल गांधी यांनी देशात न्याय हक्क यात्रा, भारत जोडो यात्रा सारखा प्रयोग करून मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फारशा यशस्वी होताना दिसत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेसकडे असलेला कार्यकर्त्यांचा अभाव हेच आहे. याचा प्रयत्य सध्या उत्तर प्रदेशमध्ये येत आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या संख्याबळाशिवाय 18 व्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे अनेक माजी पदाधिकारी, नेते, खासदार, आमदार पक्षाचा प्रचार करण्यापासून चार हात लांब रहात आहेत. प्रचार करण्याची तसदी घेणेही त्यांना आवश्यक वाटत नाही. त्यामुळेच की काय 17 व्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील 1 लाख 61 हजार मतदान केंद्रांपैकी अनेक मतदान केंद्रे अशी होती जिथे काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्तेही सापडले नाहीत. हीच परिस्थिती यावेळच्याही निवडणुकीत दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसने समाजवादी पक्षासोबत युती केली. काँग्रेस या राज्यातील रायबरेली, अमेठी, कानपूर नगर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलनशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी, देवरिया अशा 17 जागा लढविणार आहे.
लोकसभेच्या या जागा जिंकण्यासाठी काँग्रेस किती गंभीर आहे, याचे पुढील उदाहरण बोलके आहे. लखनौ येथील काँग्रेसच्या राज्य मुख्यालयामध्ये कॉंग्रेसचे राज्यात किती सदस्य आहेत याची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. यावरून येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांनी बूथ स्तरावर समित्या स्थापन करून त्या बळकट करण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
राहुल गांधी यांनी तरूणांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. काँग्रेस तरुणांना पाच ऐतिहासिक हमी देत असल्याचे ते म्हणाले होते. यामध्ये केंद्र सरकारच्या 30 लाख पदांवर तात्काळ कायमस्वरूपी नियुक्ती, प्रत्येक पदवीधर आणि पदविकाधारकाला वर्षाकाठी एक लाख रुपये स्टायपेंडसह शिकाऊ उमेदवारी, पेपरफुटी रोखण्यासाठी नवीन कायदा करून परीक्षा विश्वसनीय पद्धतीने आयोजित करणे, इकॉनॉमी कामगार भरती करणे आणि तरुणांना जिल्हा स्तरावर स्टार्ट-अप निधी उपलब्ध करून उत्तम कामाची, पेन्शन आणि सामाजिक सुरक्षिततेची हमी या त्या घोषणा होत्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या तरुण मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी या घोषणा केल्या होत्या. पण, या घोषणा घरोघरी पोहोचविण्यासाठी पक्षाकडे पुरेसे कार्यकर्ते नसल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारी बनल्यानंतर राज्यातील कार्यकर्त्यांना प्रियंका गांधी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, प्रियांका गांधी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेश मुख्यालयाकडे पाठ फिरविली. राहुल गांधी यांनीही तोच कित्ता गिरविला. त्याचाच हा परिणाम असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत.