पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची वास्तू धोक्यात, पुरातत्व विभागाचा दावा
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदिर हे अवास्तव बांधकामामुळे धोक्यात असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराची राज्य पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. यावेळी मंदिराचे मूळ रूप टिकवण्यासाठी मंदिरात वेळोवेळी झालेले अनावश्यक बांधकाम काढून टाकणार असल्याचं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामुळे मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावाही पुरातत्व विभागाच्या […]
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदिर हे अवास्तव बांधकामामुळे धोक्यात असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराची राज्य पुरातत्व विभागाच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. यावेळी मंदिराचे मूळ रूप टिकवण्यासाठी मंदिरात वेळोवेळी झालेले अनावश्यक बांधकाम काढून टाकणार असल्याचं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामुळे मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावाही पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये असलेल्या ग्रॅनाईटमुळे मूर्तीवर आर्द्रतेचा परिणाम होऊ शकतो. मूर्तीचे अधिक काळ जतन होण्यासाठी हे अनावश्यक बदल काढण्याची गरज आहे. तसेच मंदिराच्या आत हवा येण्यासाठी केलेल्या अनेक खिडक्यांमुळे मंदिराच्या मूळ रुपात बदल झालेला आहे. तो बदल पूर्ववत करण्याची गरज असल्याचंही यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मंदिराच्या छतावर कळस आणि वातानुकुलीत यंत्रणेसाठी केलेल्या सुविधा यांमुळे छतावरील भार वाढला आहे. तो भार मंदिरावर येतो आहे. त्यामुळे मूळ मंदिराच्या वास्तूस धोका निर्माण झाला आहे, असं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
संत नामदेव पायरी पासून ते पश्चिम द्वारापर्यंत मंदिराच्या वास्तूची पाहणी पुरातत्व विभागाच्या पथकाने केली. यानंतर संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडीट करून काय बदल करावा याचा अहवाल पुरातत्व विभाग मंदिर समितीपुढे मांडेल. त्यानंतर मंदिराचे मूळ रुप जतन करण्याच्या दृष्टीने काम केलं जाईल.
पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदिर हे अकराव्या शतकातील असल्याचं मानलं जातं. या मंदिराची मूळ वास्तू ही संपूर्ण दगडापासून बनवण्य़ात आली आहे. त्यानंतर वेळोवेळी या मंदिराच्या बांधकामात सोयीनुसार बदल करण्यात आला. यावेळी मंदिराच्या छतावर स्लॅब टाकण्यात आल्याने छतावरील भार वाढला आहे, तसेच हवा खेळण्यासाठी छतावरील अनेक दगडं काढून तिथे मोठ्या खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मंदिराच्या छतावर विविध बांधकामही करण्यात आले आहे. यामुळे मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.