शेळ्या-मेंढ्या चारल्या म्हणून गुन्हे दाखल करणं थांबवा : असीम सरोदे
सरकारने प्रत्येक जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी स्वंतत्र चराई कुरण उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी असीम सरोदे यांनी केलीय (Asim Sarode on Shepherd).
मुंबई : शेळ्या-मेंढ्या सरकारी जागेवर चरण्यावरुन मेंढपाळांवर गुन्हे दाखल होणे थांबले पाहिजे. वनविभाग व पोलिसांनी मेंढपाळांचे असे गुन्हेगारीकरण थांबवावे. तसेच सरकारने प्रत्येक जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी धनगरांना स्वंतत्र जागा व चराई कुरण उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी मानवीहक्क कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी केली आहे (Asim Sarode on demands of Shepherd community). ते महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या समस्यांवर आयोजित बैठकित बोलत होते. या ऑनलाइन मीटिंगमध्ये भटक्या विमुक्त जाती-जमातींचे अभ्यासक, शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
असीम सरोदे म्हणाले, “हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे आहे. धनगर हे पारंपरिक पद्धतीने शेळी-मेंढीपालन करतात. महाराष्ट्रात तीन लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या या समूहासाठी, स्थलांतरित मेंढपाळांना सुरक्षितता मिळावी म्हणून सरकारने जबाबदारी घेतलीच पाहिजे. या सर्व समस्यांचा अभ्यास करुन त्याची आकडेवारी काढली जाईल. यानंतर या मागण्या सरकारच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करुन कायद्यात रुपांतर करण्यासाठी मेंढपाळ समितीकडून प्रयत्न करु.”
“मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासन योग्य उपाय योजना का करीत नाही?”
मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासन योग्य उपाय योजना का करीत नाही? असा प्रश्न यावेळी शिक्षणातज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “मेंढ्या चारण्यासाठी हा समूह केवळ 6 महिने भटकत असतो. हा सरकारने करुन घेतलेला गैरसमज धनगरांच्या मुलांसाठी योग्य शिक्षण यंत्रणा नसल्याचे कारण आहे. वर्षांतील बाराही महिने आपल्या गावापासून दूर राहणारा धनगर समाजातील मेंढपाळ हा मोठा घटक आजही अज्ञानी आहे. आजपर्यंत हा समाज निमभटका समजला जातो. तसे समजणे चुकीचे आहे हे सरकारच्या लक्षात आणून द्यावे लागेल. मेंढपाळ शिक्षणापासून कोसो दूर आहे. यामध्ये साक्षरतेचे प्रमाण खूपचं कमी आहे. मेंढपाळांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना स्वतंत्र आश्रमशाळा किंवा वसतिगृह करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेल्या भटक्या जमातीच्या वसतीगृहांमध्ये मेंढपाळांच्या मुलांना खूप कमी जागा असतात. त्यामुळे याबाबतीतही धोरणात्मक काम करावे लागेल.”
सध्या कोरोनासारख्या साथीच्या रोगामध्ये ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला. यामुळे पोट भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मेंढपाळांसमोर उदरनिर्वाहाचे अनेक प्रश्न निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या प्रश्नांवर झूम मिटिंगद्वारे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. संविधान प्रचारक मनीष देशपांडे यांनी याचं आयोजन केलं. या बैठकीत मेंढपाळांसाठी निर्वाह साधन, मेंढ्या चरायला नेताना, महामार्ग रस्ते वापरताना, गाव पार करताना, शेतीच्या बांधावरुन जाताना आणि वन क्षेत्रातून जाताना येणाऱ्या अडचणी व सुरक्षेची गरज याबाबत चर्चा झाली. मेंढपाळपुत्र नवनाथ गारळे, अंकुश मुढे, अर्जुन थोरात यांनी याची माहिती दिली.
“मेंढपाळांकडून लोकर खरेदीबाबत सरकारचे धोरणच नाही”
धनगर समाज समूहातील 60 टक्क्यांहून अधिक समाजाला शेळ्या-मेंढ्याचे कळप घेऊन हिंडावे लागते. दऱ्याखोऱ्यातून, ऊन-पावसाच्या अडचणींना तोंड देत खडतर जीवन जगावं लागतं. शेळी-मेंढीपालन हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन राहिले आहे. पण मेंढपाळांकडून लोकर खरेदीबाबत सरकारचे धोरणच नाही, असा मुद्दा अर्जुन थोरात यांनी मांडला.
दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, माण, खटाव आणि जत तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळांची संख्या आहे. तसेच खानदेशात धुळे, साक्री भागांत तर विदर्भातील अकोला, खामगाव, यवतमाळ भागात शेकडो मेंढपाळ आहेत. हे मेंढपाळ दिवाळी झाल्यावर संसाराचा गाडा घोड्यावर घेऊन मेंढ्यांसह ठिकठिकाणी वस्ती करतात. जिकडे चारा-पाणी मिळेल तिकडे स्थलांतर करत असतात. चराईसाठी वेगवेगळ्या भागात स्थलांतर व शेकडो किलोमीटरची पायपीट करतात. असं असताना मेंढपाळांसह त्यांच्या कुटुंबीयांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यांना कोणतीही सुरक्षा सरकारद्वारे पुरविली जात नाही, अशी खंत अंकुश मुंढे आणि नवनाथ गारळे यांनी व्यक्त केली.
“धनगर समाजाला नेते मिळाले, पण मेंढपाळांना नेता मिळाला नाही”
अर्जुन थोरात म्हणाले, “महाराष्ट्रात धनगर समाजाला नेते मिळाले. परंतू मेंढपाळांना नेता मिळाला नाही. मेंढपाळांना चराऊ कुरणे मुक्त करण्यात यावीत. काही भागात मेंढपाळांवर व मेंढपाळांच्या लहान बालकांवरही हिंसक पशु हल्ले करतात. त्यापासून संरक्षण करण्यासाठी मेंढपाळांना बंदूक देऊन ती बाळगण्याचा परवानगी द्यावी. ही मागणी आजची नाही, तर 1995 पासूनची आहे. त्याचबरोबर पशुधन हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांना महामंडळाकडून कोणतीही मदत होत नाही. मेंढपाळांच्या प्रश्नांना आजपर्यंत सर्वच स्तरातून बगल देण्यात आली. मेंढपाळ हा घटक नष्ट करण्याचे षडयंत्र आहे.”
मेंडपाळांच्या समस्या सोडवणुकीसाठा समितीचं गठन
समाजात शेळ्या-मेंढ्यांचे पालन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र यातील अनेक लोकांवर सरकारी जागेत शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी सोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल होतात. ते टाळण्यासाठी सरकारने पर्यायी व्यवस्था करावी. दैनंदिन जीवन जगत असतानाच्या मेंढपाळांच्या समस्या ऐकून घेतल्यावर मेंढपाळांच्या समस्या आणि मागण्यांचा मसुदा सरकारपुढे मांडून त्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी अॅड. असीम सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये भटक्या विमुक्त जाती-जमातींचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी, मेंढपाळपुत्र अर्जुन थोरात, अंकुश मुढे, आनंद कोकरे, नवनाथ गारळे, सौरभ हाटकर, संविधान प्रचारक कार्यकर्ते मनीष देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश जाधव यांची राज्यस्तरीय मेंढपाळ हक्क समिती तयार करण्यात आली आहे.
- मेंढपाळांच्या प्रमुख मागण्या-मेंढपाळांना सरकारने सेफ्टी किट द्यावी ज्यामध्ये फोल्डिंगचा तंबू, कुर्हाड, मेंढ्यांचे हिंसक पशुंपासुन संरक्षण करण्यासाठी एयर गन, आत्मसंरक्षणासाठी घोंगडी, छत्री, रेनकोट, टॉर्च, प्रथमोपचार पेटी यांचा सामावेश असावा.
- मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात यावे व वेगळ्या फिरत्या शाळांची सुद्धा योजना करावी.
- स्थिर निवासी शाळांची योजना मेंढपाळांच्या मुलांसाठी करावी.
- मेंढपाळांचा निवराहक्क मान्य करून घरकुल योजना बनवावी
- मेंढपाळ बांधवांना चराऊ पास देण्यात यावेत जेणेकरून फाॅरेस्ट अधिकारी विनाकारण त्रास देणार नाहीत
- मेंढपाळांना फिरतं रेशनकार्ड देण्यात यावं जेणेकरून कोणत्याही भागात त्यांना शिधा घेता यावा
- मेंढपाळ व महिलांचे शोषण थांबविण्यासाठी विशेष कायदा बनवविण्यात यावा
- मेंढपाळांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास महामंडळातुन विशेष आर्थिक मदत देण्यात यावी
- गरोदर महिलांना बालसंगोपन करण्यासाठी मदत मिळावी.
- मेंढपाळ कुटुंबातील स्त्री-पुरुषांसाठी आवश्यक कायदेविषयक माहिती देण्याचे उपक्रम सुरू करावेत
या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते नागेश जाधव, संविधान प्रचारक कार्यकर्ते मनीष देशपांडे, मेंढपाळपुत्र अंकुश मुढे, आनंद कोकरे, अर्जून थोरात, नवनाथ गारळे, सौरभ हाटकर इत्यादी उपस्थित होते.
हेही वाचा :
पडळकर, रात्रभर झोप येणार नाही अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ, हसन मुश्रीफ यांचा दम
Anil Deshmukh | 100 गाड्यांचा ताफा घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई, गृहमंत्र्यांचा पडळकरांना इशारा
Pandharpur Wari | मी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Asim Sarode on demands of Shepherd community