मुंबई : मूळची परळीची असलेली पुणे स्थित तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही विषयांवर अग्रलेख लिहिणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आता कुठे गेलेत?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (Atul Bhatkhalkar Criticized Sanjay Raut over Puja Chavan Suicide Case)
एम.जे. अकबरांवर अग्रलेख लिहिणारे राऊत आता का अग्रलेख लिहित नाहीत?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला. ज्या संजय राऊतांनी एम.जे. अकबरांवर आरोप झाले तेव्हा अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. आता संजय राऊत कुठे गेले आहेत. हा त्यांचा दुतोंडीपणा आहे, अशी घणाघाची टीका करत राऊतांनी या प्रकरणावर बोलायला हवे” असं भातखळकर म्हणाले.
राज्यातील अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होत आहे. मागील महिनाभरापूर्वी एका मंत्र्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाला. आता महिना उलटत नाही तोपर्यंतच दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप होतोय. या राज्यात बदमाशांचं सरकार कार्यरत आहे, असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला.
दुसरीकडे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेनेची गोची झालीय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पण संजय राऊत यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.