VIDEO | औरंगाबादेत घाटी रुग्णालयात कोरोनाग्रस्ताचा हैदोस, घरी जाण्यासाठी दरवाजाची तोडफोड
औरंगाबादमधील 'गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' अर्थात घाटीमध्ये हा प्रकार घडला.
औरंगाबाद : औरंगाबादमधील ‘घाटी’मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये तोडफोड करत रुग्णाने डॉक्टरांनाही मारहाणीचा प्रयत्न केला. घरी जाण्याची मागणी करत संबंधित रुग्ण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. (Aurangabad GHATI Corona Patient breaks door in Hospital)
रुग्णाने केलेल्या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. औरंगाबादमधील ‘गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ अर्थात घाटीमध्ये हा प्रकार घडला. वॉर्ड क्रमांक 31 मध्ये असलेल्या रुग्णाने घरी जाण्याच्या मागणीसाठी थयथयाट केला.
नेमकं काय घडलं?
संबंधित कोरोनाग्रस्त रुग्णाने सुरुवातीला वॉर्डच्या दरवाजाची काच फोडली. मोठा आवाज झाल्यामुळे रुग्णालयातील नर्स, वॉर्डबॉय, डॉक्टर असा स्टाफ दरवाजाबाहेर जमा झाला. सुरुवातीला त्याची बाबा-पुता करुन समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रुग्ण कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.
रुग्णाने आधी वॉर्डमध्ये जाऊन स्टूल आणले. त्यानंतर ते दरवाजावर आपटून तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी दरवाजात आडवा दांडा टाकून दरवाजा घट्ट बंद करण्याचा प्रयत्न केला. “हा काय प्रकार चालला आहे? अक्कल आहे का थोडी फार?” असे प्रश्न विचारत रुग्णाला दरडावण्याचा प्रयत्न रुग्णालयाचे कर्मचारी करताना दिसतात.
सलाईन स्टँडनेही तोडफोड
कोरोनाग्रस्त रुग्णाने मात्र हॉस्पिटल चांगलंच डोक्यावर घेतलं. कुठल्याही परिस्थितीत वॉर्डबाहेर पडण्याचा त्याचा निश्चय झाला होता. त्याने सलाईन लावलेला स्टँड खेचून आणत तोही दरवाजावर आपटला. अखेर सुरक्षारक्षकांनी वॉर्डच्या आत जाऊन रुग्णाची धरपकड केली.
VIDEO | Aurangabad | घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णाकडून तोडफोड, डॉक्टरांनाही मारहाण #Corona_Patient #Ghati_Hospital pic.twitter.com/v5O7BvNmdS(Aurangabad GHATI Corona Patient breaks door in Hospital)
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
औरंगाबादेत रुग्णालय तोडफोडीची पुनरावृत्ती
औरंगाबादेत एमजीएम रुग्णालयात कोरोना निगेटिव्ह रुग्णाला पॉझिटिव्ह दाखवून त्याच्यावर कोरोना उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली होती. रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीमुळे एमजीएम रुग्णालयही वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयात तोडफोड झाल्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. डॉक्टरऐवजी कंपाऊंडरने औषधं दिल्याने 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा करत वर्ध्यात नागरिकांकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
डॉक्टरऐवजी कंपाऊंडरने औषधं दिल्याचा दावा, 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून रुग्णालयाची तोडफोड
(Aurangabad GHATI Corona Patient breaks door in Hospital)