औरंगाबादः शहरातील महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Aurangabad municipal Corporation) प्रभाग प्रारुप आराखड्यावर (ward structure) आतापर्यंत 29 आक्षेप आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. मनपाच्या 42 प्रभागांचा प्रारुप आराखडा 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार, 14 जूनपर्यंत 29 जणांनी आक्षेप नोंदवले आहेत. आराखड्यावर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 16 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 17 जून रोजी नागरिकांकडून मिळालेल्या सूचना आणि हरकती निवडणूक आयोगकाकडे (Election Commission) पाठवल्या जातील. 24 जून रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर आयोगाकडे शिफारशी केल्या जातील. नव्याने केलेल्या प्रभागरचनेत अनेक प्रस्थापित नेत्यांच्या वॉर्डांचे विविध प्रभागांत विभाजन झाले आहे. त्यामुळे या विभाजनावर नेत्यांनी आक्षेप घेतले आहेत. भाजपनेही यापूर्वी आराखड्यावर आक्षेप नोंदवला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणुकूक आयोगाकडे तक्रार केली आहे. औरंगाबाद महापालिकेचा प्रभाग रचना आराखडा जाहीर होण्यापूर्वीच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा गोपनीयतेचा भंग असल्याने आराखडा नव्याने करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आराखडा सादर करताना तो पाहण्यास अधिक स्पष्ट आणि सोपा जावा, याकरिताही त्यांनी अनेक सूचना दिल्या आहेत.