Aurangabad | औरंगाबाद महापालिका प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी, नवीन नकाशा प्रसिद्ध, पहा तुमचा वॉर्ड कोणता?
आक्षेपानंतर सुधारणा करून प्रभाग रचनेचा अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. मंगळवारी त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आज तो सामान्यांसाठी जारी करण्यात आला.
औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad municipal corporation) प्रभाग रचनेच्या अंतिम आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election commission) अंतिम आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यानुसार बुधवारी महापालिकेतर्फे हा नवीन प्रभाग रचना (Ward structure) आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. हा नवीन नकाशा प्रत्येक प्रभागाच्या हद्दी, व्यापर्ती आणि वर्णन दर्शनणारे विवरणपत्र मनपाच्या सूचना फलकावर तसेच झोन कार्यालयात आणि मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे निवडणूक विभागप्रमुख डॉ. संतोष टेंगळे यांनी ही माहिती दिली. शहरातील पडेगाव, कांचनवाडी, सातारा तांडा, देवळाई, हर्सूल सावंगी, केम्ब्रिज बायपास, शरणापूर चौफुली पर्यंतचा महापालिका नकाशा जाहीर करण्यात आला आहे.
126 वॉर्ड 42 प्रभाग
महापालिकेच्या निवडणुका यंदा तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार औरंगाबाद शहरातील 126 वॉर्डांचे 42 प्रभाग करण्यात आले आहेत. या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने 26 मे 2022 रोजी मान्यता दिली होती. मनपाने प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि हद्दींचा नकाशा २ जून रोजी प्रसिद्ध करून त्यावर 16 जूनपर्यंत हरकती-सूचना मागवल्या होत्या. त्यावर 22 जून रोजी सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून नेमलेले नोंदणी महानिरीक्षक किरण हर्जीकर यांच्यासमोर 324 जणांनी आक्षेप मांडले. त्यापैकी बहुतांश आक्षेप प्रभागांच्या हद्दीबाबतच होते. त्यापैकी 15 सुधारणा करण्याचे निर्देश निवडणूक विभागाने दिले. हा बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. मंगळवारी त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आज तो सामान्यांसाठी जारी करण्यात आला.
इथे पहा नवा नकाशा…
औरंगाबाद महापालिकेच्या वेबसाइटवर नवीन प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो पुढील लिंकवर क्लिक केल्यावर पाहता येईल. यात तुमच्या कॉलनीचा कोणत्या वॉर्डात समावेश आहे, हे दिसून येईल.
निवडणूक कधी?
राज्यातील महापालिका निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 14 महापालिका निवडणुका होणार असून उर्वरीत महापालिका निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील. मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, ठाणे आदी महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल. या निवडणुका सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये औरंगाबाद महापालिकेचा समावेश आहे. या टप्प्यात भिवंडी, पनवेल, मीरा-भाइंदर, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड, लातूर, चंद्रपूर आदींचा समावेश आहे. प्रलंबित निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे याही निवडणुका पुढील चार ते पाच महिन्यात होण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणासह निवडणूक?
राज्यातील ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, त्या आरक्षणाशिवाय होतील. मात्र ज्या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, तेथे 27% ओबीसी आरक्षण मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने आज ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वूपूर्ण निकाल दिला आहे. राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात मांडण्यात आलेला बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने स्वीकारला असून ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण देण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे. या यापुढे ज्या निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर होतील, त्यात 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू राहिल.