दोन दशकं, अखंड मेहनत, वीरभद्रा नदीवर बंधारा, आता वाळूपट्ट्यावर अधिकाऱ्यांची नजर, पैठणचं नांदर गाव तापलं!
ग्रामपंचायतीने ठराव दिलेला असताना उपविभागीय अधिकारी मोरे यांनी याच प्रश्नावर आता 9 मार्च रोजी ग्रामसभा बोलवली आहे. प्रशासानाच्या दबावासमोर नांदर ग्रामस्थ झुकतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
औरंगाबादः पैठण तालुक्यात (Paithan) वीरभद्रा नदीचा (Veerbhadra River) किनारा लाभलेला नांदर गाव. आपल्या गावातल्या नदीपात्रातून वाळूचा उपसा होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी कंबर कसली. मागील दोन दशकांपासून डोळ्यात तेल घालून नदीपात्राची सेवा केली. सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून बंधारा बांधला. गावकऱ्यांच्या अथक मेहनतीचं फळ मिळालं. नदीपात्राता दाणेदार वाळूची रास जमा झाली. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर या वाळूवर पडलीय. येथील दोन वाळूपट्ट्यांचा लीलाव (Sand Strip Auction) करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पण ग्रामस्थ मात्र या निर्णयामुळे संतप्त झालेत. याच मुद्द्यावर आज 9 मार्च रोजी अधिकाऱ्यांनी ग्रामसभा आयोजित केली आहे. आता प्रशासनविरुद्ध ग्रामसभा अशी स्थिती आहे.
वीरभद्रा नदीची अहोरात्र सेवा
पैठण तालुक्यातील नांदर गावातून वीरभद्रा नदीपात्रातील वाळूचा लिलाव होऊ नये म्हणून, गेल्या दोन दशकांपासून नांदर ग्रामस्थांनी यशस्वी प्रयत्न केले. यंदाही गावातील वाळूपट्ट्याचा लिलाव करू नये म्हणून ग्रामपंचायतीनं महसूल विभागाला ठराव दिला आहे. मात्र वाळू पट्ट्याच्या लिलावासाठी आता महसूल विभागही हट्टाला पेटला आहे. येथील दोन वाळू पट्ट्यांच्या लिलावासाठी पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. अधिकाऱ्यांनी आता ग्रामसभा आयोजित केली असल्याने प्रशासन हवा तसा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नांदर गावातलं वातावरण चांगलंच तापला आहे.
प्रशासनाच्या दबावापुढे गावकरी झुकणार का?
नांदरच्या वाळूपट्ट्याचा लिलाव करू नये, असा ठराव नांदर ग्रमपंचायतीने 10 जून 2021 रोजी पैठण तहसील कार्यालयात सादर केला. उपलब्ध असलेला वाळूपट्ट्याचा लिलाव करून महसुलात वाढ करण्यासाठी पैठण महसूल अधिकारी एकवटले आहेत. ग्रामपंचायतीने ठराव दिलेला असताना उपविभागीय अधिकारी मोरे यांनी याच प्रश्नावर आता 9 मार्च रोजी ग्रामसभा बोलवली. प्रशासानाच्या दबावासमोर नांदर ग्रामस्थ झुकतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर बातम्या-