पुणेकर महिलेची डोकॅलिटी! चक्क नारळाच्या झाडाचं डोहाळे जेवण
पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या नीता यादवड यांनी आपल्या नारळाच्या झाडाचं डोहाळे जेवण केलं. मैत्रिणींना बोलवून त्यांनी अनोखं सेलिब्रेशन केलं

पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हणतात, ते उगाच नाही. आतापर्यंत पुणेरी पाट्या, पुणेकरांची दुपारची झोप, असे किस्से आपण ऐकलेले आहेत. मात्र आता चक्क झाडाचे डोहाळे पुरवण्याचा चंग एका महिलेने बांधला आहे. नारळाच्या झाडाला (Pune Coconut Tree) नटवून-थटवून त्याचं डोहाळे जेवण (Baby Shower) करण्यात आलं.
डोहाळे जेवण म्हटलं की ‘कुणीतरी येणार येणार गं’ हे अशीही बनवाबनवी चित्रपटातलं गाणं आठवलं नाही, असा मराठी प्रेक्षक नसेल. पण यापुढे तुम्हाला पुण्यातील महिलांनी या अनोख्या डोहाळे जेवणात गायलेली गाणी आठवल्यावाचून राहणार नाहीत. पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या नीता यादवड यांनी आपल्या नारळाच्या झाडाचं डोहाळे जेवण केलं.
नीता यादवड यांनी रत्नागिरीतील कोकण कृषी विद्यापीठातून नारळाचं झाड आणलं होतं. सावली येत असल्याने त्यांनी झाड दुसऱ्या जागी हलवून त्याचं पुनर्रोपण केलं. मात्र अचानक तीन आठवड्यांपूर्वी नारळाच्या झाडाला तुरा आला. त्याचंच सेलिब्रेशन म्हणून डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा घाट घालण्यात आला.
गर्भवतीला ज्याप्रमाणे सजवून तिची ओटी भरली जाते, तशीच जय्यत तयारी नारळाच्या झाडाच्या डोहाळे जेवणासाठी करण्यात आली होती. खणा नारळाची ओटी भरुन, हिरव्या बांगड्यांचा साज चढवत पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण करण्यात आले.
नीता यादवड यांनी आपल्या मैत्रिणींना बोलवून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. मैत्रिणींना ताला-सुरात गाणी म्हटली. नारळाच्या झाडाला छान शहाळी लगडू देत, अशी मागणी निसर्गाकडे करण्यात आली.
नारळाचं झाड हे नीता यादवड यांच्याकडे डोहाळ जेवण झालेलं पहिलंच झाड नाही. याआधी आंब्याचा मोहर पाहूनही त्यांना डोहाळे जेवण करण्याची कल्पना सुचली होती. त्यांनी आंब्याच्या झाडाचंही अशाच प्रकारे डोहाळे जेवण केलं होतं. आता नारळाचं झाड कधी लेकुरवाळं होतंय, याकडे नीता यादवड यांचे डोळे लागले आहेत.