Avika Gor | ‘बालिका वधू’चा ग्लॅमरस अंदाज, 13 किलो वजन घटवलं, अविका गौर ओळखूही येईना
"एक वेळ मी स्वतःचाच तिरस्कार करु लागले होते, असं लिहित अविका गौरने आपली 'वेट लॉस्ट जर्नी' शेअर केली
मुंबई : ‘बालिका वधू‘ (Balika Vadhu) मालिकेतून लहान वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिचा नवा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अविकाला ओळखताही येत नाही. अविकाचा फिटनेस पाहून चाहते अवाक झाले आहेत. अविकाने थोडं-थोडकं नव्हे, तर तब्बल 13 किलो वजन घटवलं. (Balika Vadhu Fame Anandi Actress Avika Gor shares her Fat to Fit Weight Loss Journey)
‘बालिका वधू’ मालिकेत अविका गौर हिने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे. मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, ‘फॅट टू फिट’ चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले.
वर्षभरापूर्वी अविकाने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. “एक वेळ अशी आली होती, जेव्हा मी स्वतःच्या शरीराबाबत नाखुश होते. मी स्वतःचाच तिरस्कार करु लागले होते.” असं अविकाने सांगितलं. इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करत अविकाने आपली ‘वेट लॉस्ट जर्नी’ सर्वांसोबत शेअर केली आहे.
“त्या रात्री मी खूप रडले…”
“मला अजूनही गेल्या वर्षीची ती रात्र आठवते, जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहिले आणि मी अक्षरशः रडू कोसळले. मी जे पाहत होते, ते मला अजिबात आवडत नव्हतं. जाडगेले हात-पाय आणि वाढलेले पोट. जर हे एखाद्या आजारामुळे झाले असते, तर ती वेगळी गोष्ट होती, कारण ते माझ्या नियंत्रणाबाहेर असते. पण मी सर्व काही खात सुटले होते आणि अजिबात व्यायाम करत नव्हते, म्हणून हे परिणाम दिसत होते. आपल्या शरीराला चांगली वागणूक दिली पाहिजे, पण मी त्याचा अजिबातच आदर राखला नाही” अशा भावना अविकाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.
“मी जशी दिसत होते, ते मला आवडत नव्हते. मला नृत्य खूप आवडतं, पण आपण कसे दिसू, याचा विचार करुन मी डान्सही करत नव्हते. मी स्वत:ला जज करत स्वत:बद्दलच वाईट विचार करायला लागले. या प्रकारची असुरक्षितता नेहमीच माझ्या मनात होती आणि त्यामुळे मला खूप त्रास व्हायला लागला” असंही अविकाने सांगितलं.
कसा घडला बदल?
“एक दिवस मी ठरवले की आता बास झाले, आता मला बदलले पाहिजे. कुठलाही बदल एका रात्रीत होत नाही. मी योग्य गोष्टींवर, ज्या गोष्टींचा मला अभिमान आहे, त्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, जसं की डान्स. मी नेहमीच चांगले खाण्याचा आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला बर्याच अडचणीही आल्या, पण मी थांबले नाही हे महत्वाचे होते. माझे निकटवर्तीय नेहमीच मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याबरोबर होते” अशा सकारात्मक भावनाही तिने व्यक्त केल्या आहेत.
संबंधित बातम्या :
कोरोनाचा फटका, ‘बालिका वधू’चा दिग्दर्शक विकतोय भाजीपाला!
(Balika Vadhu Fame Anandi Actress Avika Gor shares her Fat to Fit Weight Loss Journey)