बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका आणि हिंगोली जिल्ह्याला दिलासा देणारं वृत्त समोर आलं आहे. बारामतीतील पहिला ‘कोरोना’ रुग्ण असलेला रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त झाला आहे, तसेच हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. (Baramati First Corona Patient gets Discharge)
पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त वाढत असतानाच बारामतीमधून जीवात जीव आणणारी बातमी समोर आली आहे. रिक्षाचालकाला लागण झाल्याने बारामती तालुक्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाला होता. त्याच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते.
उपचार आणि तपासणीनंतर आता त्या रिक्षाचालकाची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात झाली आहे. त्यापैकी एक (संबंधित रिक्षाचालक) रुग्ण बरा झाला आहे, तर भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांवर उपचार सुरु आहेत.
न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाला पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं मंगळवार 14 एप्रिलला स्पष्ट झालं होतं. काही दिवसांपूर्वी याच परिसरात असलेल्या समर्थनगरमधील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. आधी भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ त्याच्या सून आणि मुलासह दोन नातींनाही कोरोनाची लागण झाली. अशातच 9 एप्रिलला या भाजीविक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. (Baramati First Corona Patient gets Discharge)
बारामतीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने बारामती पॅटर्न सुरु केला आहे. या पॅटर्नअंतर्गत नागरिकांना घरात थांबून सर्व काही अत्यावश्यक वस्तू पुरवण्यास सुरुवात झाली आहे
हिंगोलीतून गुड न्यूज
दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. हिंगोली जिल्हाच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ‘ही बाब दिलासादायक आहे. जिल्हा प्रशासन चांगली कामगिरी बजावत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्यबद्दल मी ऋणी आहे’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रूग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ही बाब दिलासादायक आहे.जिल्हा प्रशासन चांगली कामगिरी बजावत आहे तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्यबद्दल मी ऋणी आहे.@InfoHingoli @InfoMarathwada @SATAVRAJEEV @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 16, 2020