स्वतःच्या वडिलांना कोणी घराबाहेर काढतं का?, बहिणीचा भावाला खरमरीत सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला. त्यामुळे अजितदादा गटात प्रचंड जल्लोष असला तरी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर कडाडून हल्ला चढवला. 'स्वतःच्या वडिलांना कोण घराबाहेर काढत का ? ' असा सवाल विचारत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना टोला लगावला.
प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,पुणे | 12 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला. त्यामुळे अजितदादा गटात प्रचंड जल्लोष असला तरी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. आयोगाच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून आणि इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. शरद पवार गटाच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा उभे राहू आणि लढू असा विश्वास दर्शवला. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर कडाडून हल्ला चढवला. ‘स्वतःच्या वडिलांना कोण घराबाहेर काढत का ? ‘ असा सवाल विचारत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांना टोला लगावला. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या काल बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांची संवाद साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यावर त्या बोलल्या. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा अजित पवार यांना दिल्याच्या मुद्यावरूनही त्या बोलल्या. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केला. तो घेतला. तर उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्षही काढून घेतला. स्वतःच्या वडिलांना कोण घराबाहेर काढतं का ? ‘ असा खड़ा सवाल त्यांनी विचारत अजित पवार आणि शिंदे गटावरही निशाणा साधला.
श्रीराम त्याच्या वडिलांसाठी १४ वर्ष वनवासात गेला. आपल्यावर हे मर्यादा पुरूषोत्तम रामाचे संस्कार आहेत. आज ते आपला पक्ष घेवून गेले, चिन्हही नेले. आता लोक विचारतात चिन्ह कसं पोहोचवणार ? चिन्ह आपण पोहोचवू काळजी करू नका . आपण नव्याने पक्ष उभा करू, नवीन चिन्ह घेऊ, असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळेची मोठी ताकद ही इमानदारी आहे. ते सगळं घेऊन जातील पण इमानदारी कशी नेतील ? असा सवाल विचारत त्यांनी अजित पवार गटाला टोला हाणला.
पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभारू
वकिलांनी मला विचारलं कुठलं चिन्ह पाहिजे ? मी त्यांनाच म्हटलं तुला कुठलं चिन्ह घ्यायचं आहे ते घे. कोणी पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं, त्यांना न्यायचं तर घेऊन जाऊ दे. आम्ही परत पक्ष उभा करू, त्यात प्रॉब्लेम काय आहे. दुसऱ्याच्या आशीर्वादाने मी महल बांधणार नाही. या राज्यामध्ये रामराज्य आणून दाखवेन हा शब्द तुम्हाला देते असं त्या म्हणाल्या. सत्ता येईल आणि जाईल, पण लोक आपल्या सोबत राहिले पाहिजेत. मी कोणाशीही भांडत नाही कारण माझा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आहे. माझी लढाई हुकूमशाहीच्या विरोधात आहे. प्रेमाने मागा जे पाहिजे ते देतो. पण ल्लीवरून अदृश्य शक्ती आम्हाला सांगणार असं करा, मात्र आम्ही तस करू देणार नाही आम्ही ऐकणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं.