बुलडाण्यात अस्वलाचा धुमाकूळ, शेतकऱ्यावर हल्ला
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मोताळामधील कोथळी गावात सध्या अस्वालाच्या भीतीनं गावकरी घराबाहेर पडत नाहीत. काल (4 मार्च) गावातील एक तरुण शेतकरी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला असता त्याच्यावर पाठीमागून अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात हा शेतकरी गंभीर असा जखमी झाला आहे. सोमनाथ हाके असं या तरुणाच नाव आहे. सध्या या घटनेने शेतात काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण […]
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मोताळामधील कोथळी गावात सध्या अस्वालाच्या भीतीनं गावकरी घराबाहेर पडत नाहीत. काल (4 मार्च) गावातील एक तरुण शेतकरी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला असता त्याच्यावर पाठीमागून अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात हा शेतकरी गंभीर असा जखमी झाला आहे. सोमनाथ हाके असं या तरुणाच नाव आहे. सध्या या घटनेने शेतात काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जखमी शेतकऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तरुण शेतकऱ्यावर हल्ला करुन सध्या अस्वल हा केळीच्या बागेत लपल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. गावात अस्वलाला पकडण्यासाठी सध्या रेस्क्यू टीम आली असून अस्वलाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
सहस्त्रमुळई येथील रहिवासी आणि शेतकरी सोमनाथ हाके हा कापूस वेचण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी शेतातल्या मजुरांना तहान लागली म्हणून सोमनाथ पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला. मात्र याचवेळी दबा धरुन असलेल्या अस्वलाने पाठीमागून हल्ला चढवला. सोमनाथने आरडाओरड केली असता शेजारील शेतकरी मदतीला धावले, मात्र तोपर्यंत अस्वलाने पळ काढला होता.
या घटनेमुळे सध्या गावात आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे अधिकारी रेस्क्यू टीमसोबत गावात दाखल झाले आहेत. मात्र अजूनपर्यंत अस्वलाला पकडण्यात यश आलेले नाही.