मुंबईची डबल डेकर 85 वर्षांची झाली, इलेक्ट्रीक-डीझेल ते पुन्हा इलेक्ट्रीक डबल डेकरचा प्रवास
विशेष म्हणजे 1920 मध्ये पहिली ट्राम इलेक्टीक डबल डेकर मुंबईत धावली होती. तर त्यानंतर 1937 मध्ये इंधनावरील मोटर डबल डेकर सेवेत आली, आता नव्या वर्षात पुन्हा इलेक्ट्रीक डबल डेकर सेवेत येत असल्याने एक वतृळ पूर्ण होत आहे.
मुंबई : मुंबईकरांची लाडकी असलेली बेस्ट ( BEST ) आज 85 वर्षांची होत आहे. 8 डिसेंबर 1937 रोजी पहीली डबलडेकर ( Double Decker ) बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती. गुरूवारी सायंकाळी बेस्टच्या खुल्या छताच्या दुमजली बसमध्ये तिचा 85 वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. बेस्टमध्ये सध्या 45 डबलडेकर बस शिल्लक असून त्या जुन्या झाल्याने त्यांना टप्प्या टप्प्याने सेवेतून काढण्यात येणार आहे. आणि त्यांची जागा अत्याधुनिक एसी इलेक्ट्रीक डबल डेकर बस घेणार आहे. ही बस लंडनमध्ये धावणाऱ्या डबलडेकरच्या कंपनीनेच बनविलेली आहे. येत्या 14 जानेवारीला मकरसंक्रातीला ही डबल डेकर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.
बेस्टच्या शान असलेल्या डबलडेकर डिझेल जास्त खात असल्याने तसेच त्या जुन्या झाल्याने त्यांचे मेन्टेनन्स डोईजड झाले होते. त्यामुळे त्या हळूहळू मोडीत काढण्यात येत आहेत. त्यांच्या जागी नव्या इलेक्ट्रीक 900 डबल डेकर टप्प्या टप्प्याने बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होणार आहेत. या बसेसमुळे वायू आणि ध्वनीच्या प्रदुषणातून मुंबईकरांची मुक्तता होणार आहे. त्यापैकी पहिल्या बसचे येत्या 14 जानेवारीला लोकार्पण होणार आहे.
नव्या इलेक्ट्रीक डबल डेकर बसला दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर आत वर जाण्यासाठी ड्रायव्हर सिटीच्या मागच्या बाजूला स्वतंत्र जिना आहे. तळ मजल्यावर 33 आसने आहेत. तर एकूण 66 आसने असून एकूण 88 प्रवासी सामावू शकणार आहेत. ही बस वजनाने हलकी असून तिची किंमत 1.8 ते 2.3 कोटींच्या घरात आहे.
या बसचे डिझाईन परदेशी असून स्विच मोबिलिटी या मूळ लंडनच्या कंपनीने ती बनविलेली असून चेन्नईत तिचे भारतातील कार्यालय आहे. लंडनची स्विच मोबिलिटी कंपनी आणि अशोक लेलॅण्ड यांनी ही बस तयार केली आहे.
• वरच्या मजल्याची पहीली खिडकी …देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुलाबा ते वरळी, कुर्ला ते बीकेसी, सीएसएमटी ते नरिमन पॉईंट, कुर्ला ते सांताक्रुझ परिसरात धावणार आहे. 1947 पर्यंत 242 डबल डेकर बेस्टच्या ताफ्यात होत्या. याबसच्या वरच्या मजल्यावरील पहील्या खिडकीतून मुंबई पहाणे म्हणजे नयनरम्य सोहळा असल्याने ही सिट पकडण्यासाठी मुंबईकर आजही तरसत असतात.
1948 ते 1993 दरम्यान 882 डबलडेकर ताफ्यात होत्या. तर 2017 मध्ये 120 डबल डेकर उरल्या. तर 2019 मध्ये या बसेस टप्प्याने टप्प्याने सेवेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
1920 मध्ये पहिली डबल डेकर ट्राम मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती. 9 मे 1874 मध्ये पहीली ट्राम सेवा मुंबईत सुरू झाली. या ट्रामला घोडे जुंपलेले असायचे. तेव्हा ट्रामचे तिकीट एक आणा होते, तर तिचा वेग तासाला पाच मैल असा होता. कुलाबा ते पायधुनी वाया क्रॉफर्ट मार्केट आणि बोरीबंदर ते पायधुनी अशा दोन मार्गावर ही ट्राम धावायची. बॉम्बे ट्रामवे कंपनी लि. कडून 1907 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅण्ड ट्रामवे कंपनीने ट्राम विकत घेतली. 7 मे 1907 रोजी पहिली इलेक्ट्रीक ट्राम सुरू झाली.
ग्रँटरोड, पायधुनी, गिरगाव, भायखळा ब्रिज आणि ससून डॉक मार्गापर्यंत धावणारी ट्राम इलेक्ट्रीक होताच तिचा मार्ग किग्जसर्कल, दादरपर्यंत विस्तारला. दादर हे मुख्य ट्राम टर्मिनल झाले. तेव्हापासून या परिसराला दादर टी.टी. नाव पडले ते आजही कायम आहे. नंतर 15 जुलै 1926 मध्ये बेस्टने पहिली इंधनावर धावणारी मोटर बससेवा सुरू केली.