सांगा उपाशीपोटी कसं लढायचं ? कुलाबा,बॅकबे,वरळी बेस्ट आगाराची कँटीन बंद
मुंबई : बेस्ट उपक्रमाने येत्या काही वर्षात अनेक भविष्यकालीन योजनांची बरसात केली असली तरी प्रत्यक्षात बेस्टचे नियोजन संपूर्णपणे ढासळले आहे. बेस्टच्या कुलाबा, वरळी आणि बॅकबे आगारातील कँटीन सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे उपाशीपोटी सैन्य लढणार कसे ? असा सवाल केला जात आहे. बेस्टच्या वसाहती संपूर्ण भरलेल्या असून अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टर हे विरार, पनवेल […]
मुंबई : बेस्ट उपक्रमाने येत्या काही वर्षात अनेक भविष्यकालीन योजनांची बरसात केली असली तरी प्रत्यक्षात बेस्टचे नियोजन संपूर्णपणे ढासळले आहे. बेस्टच्या कुलाबा, वरळी आणि बॅकबे आगारातील कँटीन सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे उपाशीपोटी सैन्य लढणार कसे ? असा सवाल केला जात आहे.
बेस्टच्या वसाहती संपूर्ण भरलेल्या असून अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टर हे विरार, पनवेल तसेच कर्जत येथून पहाटेच्या शिफ्टसाठी सकाळी लवकर घर सोडत असतात. त्यामुळे सर्वांनाच सकाळी सोबत जेवणाचे डब्बे आणता येत नाहीत. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची जेवणा वाचून आबाळ होत आहे. वरळी, कुलाबा आगाराचे कँटीन बंद आहे, बॅकबेचे वरचे कँटीन बंद असून खालील कँटीन चालू केले आहे.
फॅक्टरी अॅक्ट नूसार तीन शिफ्टपेक्षा जास्त वेळ काम चालत असेल तर त्याठिकाणी विश्रांतीगृह, स्वच्छतागृह आणि कँटीनची व्यवस्था असणे गरजेचे असताना बेस्टच्या सर्वात मोठ्या वरळी, कुलाबा आणि बॅकबे आगाराची कँटीन व्यवस्था ठप्प झाली आहे. तर काही कँटीनमध्ये केवळ चहा दिला जात आहे. त्यामुळे नियोजनाचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला असून कर्मचारी वैतागले असल्याचे सुनिल गणाचार्य यांनी टीव्ही नाइन मराठी वेबसाईटशी बोलताना सांगितले.
बेस्ट नवनवीन योजनांची आतषबाजी करीत आहे. परंतू या सेवांसाठी कंडक्टरची गरज आहे. बेस्टने चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड जरी लाँच केले असले तरी कंडक्टरची गरज लागतच असते. सर्वच प्रवाशांकडे चलो अॅप किंवा स्मार्टकार्ड नाहीत. प्रवाशांची स्मार्टकार्ड्स तिकीट मशिनला चिकटवून तपासण्यासाठी तरी कंडक्टरांची गरज असून नवीन भरती न केल्याने सावळागोंधळ उडाला आहे.
बेस्टमध्ये परीवहन विभागाचे 23 हजार, वाहतूक अभियंते चार हजार, विद्युत पुरवठा विभागाचे सहा हजार तर सामान्य प्रशासन विभागाचे दोन हजार असे एकूण 33 हजार कर्मचारी सेवा बजावत आहेत. बेस्टचा तुटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. बेस्टच्या परिवहन विभागाची तूट अर्थसंकल्पात वाढलेली दाखवलेली आहे. बेस्टच्या ताफ्यात पुरेशा बस नसल्याने प्रवासी नाहीत. त्यातच तिकीट दर कमी केल्याने उत्पन्न घटले आहे. तसेच फुकट्या प्रवाशांची संख्याही प्रचंड वाढल्याने बेस्टचे आर्थिक गणित बिघडले आहे.
नविन पदे न भरता डेप्युटी चीफ मॅनेजर सारख्या पदावरील व्यक्तींना निवृत्त न करता त्यांनाच पुन्हा मुदतवाढ दिली आहे. मुंबई महानगर पालिकेने काटकसर करण्यास सांगितल्याने नविन पदे भरली जात नसल्याचे कारण दिले जात आहे. मात्र, या कंत्राटी तत्वांवर घेतलेल्या माणसांना पगार तर द्यावाच लागणार ना असा सवाल बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला आहे.
प्रबेस्टमध्ये स.8 ते 11 आणि सायं. 5 ते 9 या गर्दीच्या पिकअवरमध्ये तरी वेळेवर बसेस चालवून प्रवाशांना तत्पर सेवा देणे अपेक्षित आहे. या महत्वाच्या 8 ते 9 तासांचे नियोजन नीट न केल्याने बेस्टसेवा ढेपाळली आहे.
प्रतिक्षानगर आगारातील पिकअवरला शीव आणि जीटीबी नगर स्थानकात लोकल पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असताना अँटॉप हील मार्गे जाणाऱ्या मंत्रालय, हुतात्मा चाैक, डाॅ.श्यामा प्रसाद मुखर्जी चाैक अशा लागाेपाठ एकाच रूटच्या बसेस सोडल्या जात असल्याने हे वेळापत्रक प्रवाशांच्या फायद्यासाठी की टॅक्सी वाल्यांचा धंदा व्हावा म्हणून तयार केलेय अशा तक्रारी प्रवासी करीत आहेत.
बसेस रस्त्यावर केवळ धावताना दिसणे म्हणजे योग्य सेवा नसून त्या प्रवाशांच्या किती फायद्याच्या हे आहेत हे महत्वाचे असल्याचे गणाचार्य यांनी म्हटले आहे. बेस्टने कंत्राटी तत्वावर घेतलेल्या बसेस पैकी कंत्राटदार एमपी ऑपरेटरने माघार घेतल्याने त्याच्या 500 बसेस बंद आहेत.
स्वमालकीच्या बसेसची संख्या झपाट्याने घटली आहे. अनेक बसेस दरराेज स्क्रॅपमध्ये निघत आहेत. बेस्ट प्रशासनाने नवीन भरतीवर बंदी असल्याने कंडक्टरची टंचाई निर्माण झाली आहे. अॅडमिनिस्ट्रेशनचा कारभार बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या हाती असून पालिकेचे आयुक्त ज्याप्रमाणे गाईड करतील तसे ते मान डोलवित असल्याने नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे गणाचार्य यांनी म्हटले आहे.