धक्कादायक! अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही घरातच ठेवल्याने कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, पत्नीविरोधात गुन्हा
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णाला घरातच ठेवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (patient died after being kept at home)
भंडारा : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णाला घरातच ठेवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार लाखांदूरमध्ये घडला असून हलगर्जी केल्याप्रकरणी पत्नीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (patient died after being kept at home even after the corona test report came positive)
कोरोनाचा फैलाव आता ग्रामीण भागातही पाहायला मिळतोय. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण लाखांदूर येथे हलगर्जीपणा केल्यामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लाखांदूर येथे ही घटना घडली असून 28 सप्टेंबरला मृताचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महिलेला आपल्या पतीला रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, रुग्णाची पत्नी तसेच कुटुंबियांनी रुग्णाला रुग्णालयात न नेता त्याला चक्क घरी घेऊन गेले. परिणामी योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. घडलेला प्रकार आरोग्य विभागाला कळताच परिसरात खळबळ उडाली. आरोग्य विभागाने पत्नीने हलगर्जी केल्याच्या आरोप करत तिच्याविरोधात कलम 188 नुसार तक्रार दाखल केली आहे.
आरोग्य विभागाने हलगर्जी केल्याचा आरोप
माझ्या पतीचा मृत्यू हलगर्जीपणामुळे नाही, तर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे झाला आहे, असा आरोप रुग्णाच्या पत्नीने केला आहे. नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास उपचारासाठी कोव्हिड सेंटरला घेऊन जाणे हे आरोग्य प्रशासनाचे काम आहे. तसा दावा रुग्णाच्या पत्नीने केला आहे. तसेच रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णाला खासगी वाहनाने घेऊन जाण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिल्याचा दावाही रुग्णाच्या पत्नीने केला. रुग्णाला नेण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नझाल्याने शेवटी पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आरोग्य विभागाने मृत रुग्णाच्या पत्नीला समजावून का सांगितले नाही? की रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका खरंच मिळाली नाही का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
संबंधित बातम्या :
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली
(patient died after being kept at home even after the corona test report came positive)