भोपाळ : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Bhopal Police helps to laborer) आहे. या दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप मिळत आहेत. तसेच कठोर कारवाईही केली जात आहे. पण याच दरम्यान भोपाळमध्ये पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन घडले आहे. चार तरुण सूरतहून आपल्या घरी भोपाळकडे एक हजार किमी पायपीट करत आले. त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाली आहे. ही जखम पाहून रस्त्यावर बंदोबस्तसाठी उभ्या असलेल्या पोलिसाने स्वत:च्या हाताने तरुणाच्या पायावरची जखम साफ करुन प्राथमिक उपचार केले. पोलीस औषध लावतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून सर्वच स्तरातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव (Bhopal Police helps to laborer) होत आहे.
लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यामध्ये काम करणारे कामगार आणि मजूर रस्त्यावर आले आहेत. कंपनी बंद झाल्याने अनेक मजूर चालत आपल्या घराकडे जाण्यास निघाले. याच दरम्यान सूरतवरुन भोपाळला जाण्यासाठी हे चार तरुण निघाले होते. तीन दिवस आणि तीन रात्र हे तरुन चालत होते. एक हजार किमी चालत आल्याने त्यांच्या पायाला जखमा झाल्या होत्या. या चारही तरुणांची परिस्थिती पाहून भोपाळ पोलीसही भावूक झाले.
सोमनाथ, सत्यम, विनय पटेल आणि रविंद्र कुमार लोधी हे चारही तरुण मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील उमरिया गावात राहतात. हे चौघे सूरतमधील एका कंपनीत काम करत होते. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद झाली आणि त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी सर्व सार्वजनिक वाहतूक बंद झाल्याने हे चौघेही जंगलातून चालत भोपाळमध्ये पोहोचले. भोपाळमध्ये पोलिसांनी चारही तरुणांची तपासणी केली आणि कटनी जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था करुन दिली.
“हे चारही तरुण आम्हाला बजरंग नगरच्या बायपास येथे चालतना दिसले. हे तरुण लंगडत होते आणि त्यांच्या पाठीवर बॅग होती. त्यामुळे आम्ही त्यांना थांबवले. थांबवल्यानंतर पाहिले तरुणांच्या पायाला जखम झालेली होती. त्यामुळे त्यांनी तरुणांच्या पायाची जखम साफ करुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या गावी उमरिया येथे एका ट्रकने पाठवले”, असं कटनीचे पोलीस अधिकारी विजेंद्र तिवारी यांनी सांगितले.