भाजपचे माजी खासदार आणि विद्यमान जळगाव अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचं निधन
भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(BJP Jalgaon president Haribhau Jawale dies)
जळगाव/ मुंबई : भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते. हरिभाऊ जावळे यांची यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती. (BJP Jalgaon president Haribhau Jawale dies)
गेल्या काही दिवसांपासून हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी त्यांना जळगाववरुन मुंबईला हलवलं होतं.
दरम्यान, हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी खासदार व माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे आज निधन झाले. मी त्यांना भाजपा, महाराष्ट्रच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 16, 2020
ॐ शांती! माजी खासदार, जळगाव जिल्ह्याचे विद्यमान भाजपा अध्यक्ष हरी भाऊ जावळे जी यांच्या निधनाची बातमी खूप दु:खद आहे. त्यांचे सामाजिक आणि राजकीय योगदान प्रेरणादायी होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो!
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 16, 2020
दोनवेळा आमदार
हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते. हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबई उपचार सुरू असताना आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे.
भाजप नेते हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला होता.
भाजपने हरिभाऊ जावळे यांच्याकडे जळगाव जिल्हाध्यक्षपद सोपवलं होते. जळगाव जिल्हाध्यक्ष निवडताना मोठा राडा झाला होता. धक्काबुक्की, शाईफेक आणि राडेबाजीनंतर जळगाव जिल्ह्याचा भाजप अध्यक्ष ठरला होता. माजी आमदार आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे (BJP Jalgaon president selection) यांची ‘एकमताने’ निवड करण्यात आल्याची घोषणा, भाजप खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली होती.
(BJP Jalgaon president Haribhau Jawale dies)
कोण होते हरिभाऊ जावळे?
- हरिभाऊ जावळे हे विद्यमान जळगाव भाजप अध्यक्ष होते
- मोठ्या वादानंतर हरिभाऊ जावळे यांची या वर्षीच्या सुरुवातीला भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती
- हरिभाऊ जावळे यांनी लोकसभा आणि विधानसभेचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
- हरिभाऊ जावळे यांनी १९९९ ते २००४ पर्यंत विधानसभेवर निवडून गेले.
- हरिभाऊ जावळे यांनी रावेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
- २००७ मध्ये पोटनिवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते
- मग २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या ऐवजी रक्षा खडसे यांना तिकीट मिळालं
- त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले
- मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शिरीष चौधरींनी त्यांचा पराभव केला
संबंधित बातम्या