एक काम करा, विषाची बाटली आणा, तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो : भाजप आमदार
नाशिक : भाजपचे नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी कर्जबाजारी शेतकऱ्याला अजब सल्ला दिलाय. माझ्यावरही कर्ज आहे. विषाची बाटली आणा. तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ऊसाचे चुकारे मिळत नसल्याने बाळासाहेब डेर्ले या शेतकऱ्याने काही […]
नाशिक : भाजपचे नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी कर्जबाजारी शेतकऱ्याला अजब सल्ला दिलाय. माझ्यावरही कर्ज आहे. विषाची बाटली आणा. तुम्ही अर्धी प्या, मी अर्धी पितो, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
ऊसाचे चुकारे मिळत नसल्याने बाळासाहेब डेर्ले या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या बॉयलरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पैसे देण्याचं आश्वासन देऊन डेर्ले यांची समजूत काढण्यात आली. यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी, आमदार राहुल आहेर आणि वसाका कारखान्याच्या ठेकेदारांची बैठक झाली.
जिल्हाधिकारी कार्यालायत झालेल्या या बैठकीतच खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पैसे मिळत नसतील तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असं बाळासाहेब डेर्ले यांनी म्हणताच, आमदार राहुल आहेर यांनी त्यांना किती कर्ज आहे, अशी विचारणा केली. त्यावर डेर्ले यांनी तीन लाख रुपये असं उत्तर दिलं. यानंतर आमदार साहेब म्हणाले, “माझ्यावर सात कोटी रुपयांचं कर्ज आहे, विषाची बाटली आणा, तुम्ही पण अर्धी बाटली प्या आणि मी अर्धी पितो”
आमदारांच्या या वक्तव्यानंतर वातावरण तापलं होतं. पण अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि शेतकऱ्यांना शांत केलं. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लवकरच कारखान्यांच्या ठेकेदारांची संयुक्त बैठक घेऊ, असं आश्वासन आमदार राहुल आहेर यांनी दिलं.
खरं तर लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे जातात. पण लोकप्रतिनिधींकडूनही असं बेजबाबदार उत्तर मिळत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न आहे.