वीजबिल माफीसाठी भाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन
महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात (Electricity Bill ) सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी (23 नोव्हेंबर) भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. (BJP organised Protest on Monday for electricity bill relief, Chandrakant Patil appeal to the citizens to participate)
चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा राज्यात सर्वत्र वीजबिलांच्या होळीचे आंदोलन करणार आहे.
पाटील म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते, त्यामुळे नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला कोणत्याही प्रकारचे पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले आली आहेत. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. जनतेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा.
वीजबिलं भरूच नका; मनसेचं राज्यातील जनतेला आवाहन
सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. वीजबिल भरू नका. काय होतं ते पाहू पुढे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं.
नांदगावकर म्हणाले की, सोमवारनंतर राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या
‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’ वीज बिलावरून नितेश राणेंची जहरी टीका
सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम, वीजबिल कमी करा अन्यथा उग्र आंदोलन, मनसेचा एल्गार
शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी, ठाकरे सरकारचा निर्णय
(BJP organised Protest on Monday for electricity bill relief, Chandrakant Patil appeal to the citizens to participate)