बाईक अलार्मच्या ठणाण्यावर तालबद्ध डान्स, या चिमुरड्याचा व्हिडीओ पाहिलात?
बाईकच्या सिक्युरिटी अलार्मच्या तालावर बेफाम नाचणाऱ्या चिमुरड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर पोट धरुन हसायला लावणाऱ्या कंटेन्टची कमतरता नाही. इंटरनेटवर सध्या वायरल झालेल्या फनी व्हिडिओपैकी एक आहे, बाईक अलार्मच्या तालावर लयबद्ध डान्स (Boy Dancing on Bike Alarm) करणाऱ्या चिमुरड्याचा. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यावर तूफान प्रतिसाद मिळाला.
जेमतेम सात-आठ वर्षांचा एक खट्याळ चिमुरडा या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रस्त्याशेजारी पार्क असलेल्या बाईकमध्ये बाईकचा सिक्युरिटी अलार्म असल्याचं माहित असल्याने, तो जाणून बुजून हात लावतो. त्यासरशी अलार्मचा ठणाणा सुरु होतो.
बाईकचे सिक्युरिटी अलार्म आपल्यासाठी नवीन नाहीत. चोरांपासून सावध राहण्यासाठी हे अलार्म कार-बाईकमध्ये बसवलेले असतात. ते वाजायला लागताच अर्धा किलोमीटर परिसरात तरी आवाज घुमतो.
खरं तर हा आवाज ऐकून कोणाचेही कान किटतील. मात्र हा अवली पोरगा त्या तालावर नाचायला सुरुवात करतो. असह्य असा अलार्मचा आवाज क्षणार्धात सुकर होतो, तो या चिमुरड्याच्या ‘प्रेक्षणीय’ नृत्यामुळे. तुम्ही फुल व्हॉल्युममध्ये हा अख्खा व्हिडीओ पाहाल, याची शाश्वती.
‘अरे यार. गेल्या काही दिवसात मी पाहिलेली सर्वात मस्त गोष्ट असेल. मी अजूनही जमिनीवर लोळत हसतोय. माझ्या वीकेंडला सुरुवात झाली’ असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.
Oh man, this has to be the coolest thing I’ve seen in a long time. I’m still on the floor laughing. My weekend has begun… pic.twitter.com/eYC4MKXRDk
— anand mahindra (@anandmahindra) August 9, 2019