झाडांच्या नावाखाली गांजाची तस्करी, जळगावात 38 लाखांचे अमली पदार्थ जप्त
मुक्ताईनगरमधून येणाऱ्या एका ट्रकमधून 600 किलो गांजा एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून पकडला (Cannabis 600 kg Seized in Jalgaon) आहे
जळगाव : मुक्ताईनगरमधून येणाऱ्या एका ट्रकमधून 600 किलो गांजा एमआयडीसी पोलिसांच्या तीन पथकांनी सापळा रचून पकडला आहे. या गांजाची किंमत सुमारे 38 लाख 16 हजार रुपये इतकी आहे. हा गांजा लपवण्यासाठी ट्रकमध्ये मागच्या बाजूस पामची झाडे ठेवण्यात आली होती. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली. मुख्तार रहीम पटेल (24) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. (Cannabis 600 kg Seized in Jalgaon)
जळगावात 38 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. मुक्ताईनगरमधून एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी सहापासून जवळपास 15 अधिकारी, कर्मचाऱ्यांची तीन पथक तयार करण्यात आली.
या पथकांनी नशिराबाद, उमाळा आणि खेडी या गावांजवळ सापळा रचला. दुपारी 12 च्या सुमारास मुख्तार पटेल हा ट्रक घेऊन मुक्ताईनगरतून निघाला. दुपारी दोन वाजता हा ट्रक जळगाव शहरातील महामार्गावरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ आल्यावर पोलिसांनी त्याला सापळा रचून अडवले.
त्या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये सुमारे 600 किलो गांजा मिळून आला. गांजा लपवण्यासाठी ट्रकच्या मागच्या बाजूस पामची झाडे ठेवलेली होती. झाडांची वाहतूक करण्याच्या नावाखाली गांजाची तस्करी होत असल्याचे उघड झाले.
ट्रकचालक मुख्तार पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एमआयडीसी पोलिसांनी 38 लाख 16 हजार रुपये किमतीचा गांजा आणि 8 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 46 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Cannabis 600 kg Seized in Jalgaon)
संबंधित बातम्या :
चना डाळच्या पोत्यांखालून गुटख्याची तस्करी, तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारीचे 52 पोते जप्त
दररोज गांजाचे सेवन, फ्लॅटमध्ये भुताचा भास, सुशांतच्या कूककडून धक्कादायक खुलासे