धडाक्यात लग्न महागात, अखेर बार्शीतील आमदार पुत्रांवर गुन्हा दाखल
बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर आता गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : राज्यात कोरोना संकटाचा विळखा असताना सोलापुरात बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं मोठ्या धुमधडाक्यात आणि थाटामाटात लग्न केलं होतं. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर पोलीस प्रशासन आक्रमक झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आमादारांची दोन्ही मुलं रणजित राऊत आणि रणवीर राऊत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आधी आयोजक योगेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन टीका झाल्यानंतर अखेर पोलिसांनी आमदारांच्या मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
सोलापुरात संध्याकाळी चार वाजता कडक निर्बंध असताना जंगी विवाहाचं आयोजन
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही. अशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे राज्यात अजूनही निर्बंध कायम आहेत. कोरोनाची लाट ओसरायला मदत होईल म्हणून कडक नियमांचा त्रास होत असताना सुद्धा, लोक सहन करत आहेत. तर इकडे सोलापूर जिल्ह्यात देखील संध्याकाळी चारनंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय शनिवार- रविवारी तर संपूर्ण दिवस लॉकडाऊन असतो. मात्र या सगळ्या नियमांना खुद्द लोकप्रतिनिधीच हरताळ फासत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांना फाट्यावर बसवत जिल्ह्यातल्या बार्शी येथील आमदारांनी आपल्या मुलांचा जंगी विवाह सोहळा पार पाडला.
आमदार राजेंद्र राऊत हे बार्शीतील लक्ष्मी सोपान बाजार समितीचे चेअरमनही आहेत. त्यांची दोन मुलं रणजीत आणि रणवीर यांचा विवाह रविवारी 6.45 मि. मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी हजरोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा या लग्न सोहळ्यात उडालेला होता.
चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
विशेष म्हणजे आमदार राजेंद्र राऊत हे भाजप समर्थक असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक आमदार, पदाधिकारी देखील या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते.
भाजप आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारीदेखील या लग्नाला उपस्थित होते.
एकीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांच्यासारखे नेते पूरग्रस्त भागात जाऊन लोकांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र लग्न सोहळ्यात उपस्थिती लावत आहेत. या लग्न सोहळ्यात कोरोनाविषयक नियमांची अक्षरश: पायमल्ली होत आहे.
संबंधित बातमी : आमदार राजेंद्र राऊतांच्या दोन्ही मुलांचं धुमधडाक्यात लग्न; कोरोना नियमांची पायमल्ली, गुन्हा मात्र आयोजकावर