‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेचा साध्या पध्दतीने विवाह
एकीकडे लग्न समारंभावर कोट्यवधींचा खर्च होत असताना अंकुरने साध्या पद्धतीने विवाह करून सामाजिक संदेश दिला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाशिम : अभिनय क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहरे नेहमीच आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण मोठा खर्च करुन उत्साहात साजरे करतात. यात अमाप पैसाही खर्च केला जातो. मात्र, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अंकुर वाढवे याने याला फाटा दिला आहे. त्याने निकिता खडसे हिच्याशी अगदी साध्या पद्धतीने नोंदणी विवाह केला. एकीकडे लग्न समारंभावर कोट्यवधींचा खर्च होत असताना अंकुरने साध्या पद्धतीने विवाह करुन सामाजिक संदेश दिला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंकुर वाढवेच्या या विवाहाप्रसंगी चाहतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीव्ही कार्यक्रमामध्ये अनेकवेळा लग्नाच्या बेडीत अडकलेल्या अंकुरचं आज खरंखुरं लग्न झालं. यातही त्याने आपल्या कृतीतून एक सामाजिक संदेश दिला. अंकुर म्हणाला, “राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी वर्ग अडचणीत आहे. त्यामुळे मी नोंदणी पद्धतीने लग्न केले. इतरांनीही लग्नावर पैसे खर्च न करता साध्या पद्धतीने लग्न करावे.”
चला हवा येऊ द्या मालिकेत अगदी कमी वेळेत चाहत्यांच्या पसंतीला उतरलेल्या अंकुर वाढवेने लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम यवतमाळमधील पुसद या त्याच्या राहत्या गावी होणार आहे. अंकुर वाढवे हा जसा एक चांगला अभिनेता आहे, तसाच तो एक उत्तम कवीही आहे. त्याचा एक कवितासंग्रह देखील प्रकाशित आहे. ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ असे या कवितासंग्रहाचे नाव आहे. अंकुशने सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केले. त्याने या संधीचे सोने केले. पुढे त्याने गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या नाटकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्याने काम केले. यानंतर त्याला ‘चला हवा येऊ द्या’मध्येही काम करण्याची संधी मिळाली. मालिकेतील छोटूच्या भूमिकेने तो प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोहोचला.
शारिरीक मर्यांदांवर मात करत अंकुरने आपले अभिनय कौशल्य नेहमीच सिद्ध केले. त्याच्या याच अभिनयाचे अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही कौतुक केले आहे. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, योगेश सिरसाट या विनोदी कलाकारांसह अंकुरने देखील आपल्या वेगळ्या अभिनयाचा ठसा उमटवला.