मदत स्वीकारल्याचा फोटो फेसबुकवर पाहून शेजाऱ्यांचे टोमणे, भाजपच्या ‘चमको’ नेत्यावर गुन्हा
भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chandrapur BJP Leader Defamation Case)
चंद्रपूर : ‘कोरोना’च्या संकटकाळात गरजूंना मदत करण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र ही मदत सोशल मीडियावर चमकोगिरी करण्यासाठी नव्हे, तर मनापासून करत गुप्त ठेवावी, अशी अपेक्षा केली जाते. मदत स्वीकारल्याचा फोटो फेसबुकवर पाहून शेजाऱ्यांनी टोमणे मारल्याने व्यथित झालेल्या व्यक्तीने पोलिसात धाव घेतली आणि चमकोगिरी करणाऱ्या चंद्रपुरातील भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Chandrapur BJP Leader Defamation Case)
भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाझारे यांनी मदत करतानाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याने आपली बदनामी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ब्रिजभूषण पाझारे यांच्याविरोधात मानहानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार व्यक्ती रस्त्याने जात असताना पाझारे यांनी त्यांच्या हातात मास्क दिले होते. मास्क देतानाचे छायाचित्र काढून पाझारे यांनी हा फेसबुकवर फोटो टाकला. मात्र फोटोवर किराणा दिल्याचं लिहिलं. अशाप्रकारे मदत स्वीकारल्याचे फोटो तक्रारदार व्यक्तीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी पहिले आणि त्यांना टोमणे लगावून बेजार केले.
शेजाऱ्यांच्या टोमण्यांनी व्यथित झालेल्या संबंधित तक्रारदार व्यक्तीने अखेर पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसात ब्रिजभूषण पाझारे यांच्याविरोधात मानहानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘आपण ज्याला मदत करत आहोत, त्याचा चेहरा दाखवून त्याला लाजवत नाही का? गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का?’ असे प्रश्न विचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच सर्वांचे कान टोचले होते.
‘काही मोजके जण कॅमेराकडे बघून मदतकार्याची छायाचित्र काढणे, ज्याला मदत दिली जात आहे, त्याला कॅमेरामध्ये बघायला सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्र काढणे असे चुकीचे प्रकार करत आहेत’ असं राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं.
Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंडhttps://t.co/Os88o7UDVf#Googletrend
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
(Chandrapur BJP Leader Defamation Case)