ओडिशा राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितरित्या पार पडल्या होत्या. लोकसभेत भाजपला या राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. तर, 1997 पासून ओडिशावर सत्ता गाजवणाऱ्या बिजू जनता दलाचा भाजपकडून पराभव झाला. 147 जागांच्या विधानसभेत भाजपने 78 जागा जिंकल्या. तर, बीजेडीला केवळ 51 आणि काँग्रेसने 14 जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची गेल्या 24 वर्षापासून ओडिशावर दीर्घकाळ असलेली राजवट मोडीत निघाली. भुवनेश्वर येथील राजभवनात राज्यपाल रघुबर दास यांच्याकडे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राजीनामा दिला. मात्र, नवीन पटनायक हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर ओडिशा राज्यातील अधिकारी चिंतेत पडले आहेत. त्याच्या चिंतेचे प्रमुख कारण आहे तो नवीन मुख्यमंत्र्यांसाठी बंगला तयार करणे.
ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळाला असला तरी अनेक आव्हाने आहेत. या विजयाने केवळ राजकीय सत्ताच नव्हे तर प्रत्येक गोष्टीत बदल होणार आहे. माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक 24 वर्षे सत्तेत असल्याने अनेक गोष्टी स्थिर होत्या. 2000 पासून त्यांचे राज्य होते. पण, त्यातही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नव्या मुख्यमंत्र्यांना सध्या राज्यात कोणतेही अधिकृत निवासस्थान नाही. नवे मुख्यमंत्री यांच्यासाठी बंगला तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांना सध्या तरी कोणताही योग्य बंगला दिसत नाही.
माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक हे त्यांचे घर ‘नवीन हाऊस’मधूनच सरकारचे संपूर्ण काम पाहत असत. सरकारी निवासस्थानात स्थलांतरित होण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या घरातूनच सर्व काम करत होते. गेल्या 24 वर्षापासून त्यांचा खाजगी बंगला हेच मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान होते. अडीच दशकांपासून नवीन पटनायक घरूनच काम करत आहेत.
नवीन पटनायक यांचे वडील बिजू पटनायक यांनी राजधानी भुवनेश्वरमध्ये स्वत:साठी एक आलिशान बंगला बांधला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर नवीन पटनायक यांनी सरकारी निवासस्थानात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वडीलांच्या बंगल्यातुनच कामकाज सुरु केले. मुख्यमंत्री पदाच्या सर्व जबाबदाऱ्याही त्यांनी याच बंगल्यातून पार पाडल्या.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपने अद्याप नवीन मुख्यमंत्री कोण याची निवड केलेली नाही. परंतु, अधिकाऱ्यांनी मात्र नव्या मुख्यमंत्र्यांसाठी निवासस्थानाचा शोध सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांसाठी योग्य बंगल्याचा शोध घेण्यास त्यांनी सुरवात केली आहे. अधिकाऱ्यांनी अनेक बंगले पहिले आहेत. पण, ते पूर्ण तयार होण्यास काही वेळ लागणार आहे. यातील एक बंगला म्हणजे नवीन पटनायक यांचा तक्रार कक्ष असू शकतो. मुख्यमंत्री असताना नवीन पटनायक येथे जनतेला भेटायला येत असत.
सध्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नाही. त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांसाठी राज्य अतिथीगृहात सूट तयार करण्यात येत आहे. नवीन पटनायक यांच्या आधी हेमानंद बिस्वाल आणि जानकी बल्लभ पटनायक हे दोन्ही मुख्यमंत्री एका छोट्या बंगल्यात राहत होते. 1995 मध्ये जेपी पटनायक यांच्यानंतर आलेल्या नव्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालय दुमजली इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. याच इमारतीमध्ये नवीन पटनायक यांचा जन तक्रार कक्ष होता. पण, 2000 मध्ये नवीन पटनायक मुख्यमंत्री झाल्यानंतर ते स्वतःच्या बंगल्यात राहू लागले.