राज्यभरात हुडहुडी, मुंबई गारठली, महाबळेश्वर गोठलं, निफाडचा पारा 2 अंशांवर
मुंबई: मुंबईसह राज्याला थंडीने हुडहुडी भरवली आहे. राज्यात सर्वच जिल्ह्याचा पारा खालावला आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये झाली आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकेना इथं 2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान मुंबईकरांची आजची सकाळ कुडकुडत उजाडली. मुंबईकर नाताळातील थंडीचा अनुभव घेत आहेत. आजचा पारा 19 अंश सेल्सिअस इतका नोंदवला […]
मुंबई: मुंबईसह राज्याला थंडीने हुडहुडी भरवली आहे. राज्यात सर्वच जिल्ह्याचा पारा खालावला आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये झाली आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकेना इथं 2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान मुंबईकरांची आजची सकाळ कुडकुडत उजाडली. मुंबईकर नाताळातील थंडीचा अनुभव घेत आहेत. आजचा पारा 19 अंश सेल्सिअस इतका नोंदवला आहे. तसेच या आठवड्यात गुरुवारी तीन वर्षातील विक्रमी थंडीची नोंद झाली. त्यामुळं हा आठवडा विक्रमी थंडीचा आठवडा आहे. मुंबईत जर इतकी थंडी जाणवत असेल तर राज्यभरातील थंडीची कल्पनाच केली जाऊ शकते.
मिनी काश्मीर गोठलं
मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणारया महाबळेश्वर इथे सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याची थंडी पडल्याने, लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले आहेत. वेण्णालेक,लिंगमळा परिसरात पारा 3 अंशावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणारया महाबळेश्वरमध्ये पारा वेगाने खाली उतरला आहे. कालपासून वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील सुमारे 2 किलोमीटरच्या पट्ट्यात किमान तापमान 3 अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरलं. यामुळे त्याभागातील दवबिंदू गोठून हिमकण मोठ्या प्रमाणावर जमा झाले. या भागात गाडीच्या टपावर, शेतातील गवतावर,वेण्णालेक परिसरात सर्व ठिकाणी हिमकण गोठलेले पहायला मिळाले. सध्या नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र वाढलेल्या थंडीमुळे सकाळी पर्यटक सुखद गारव्याचाही अनुभव घेत आहेत.
धुळे गारठलं
धुळे शहर सध्या गारठून गेलं आहे. इथे जणू बर्फवृष्टी अनुभूती येत आहे. उत्तरेकडे हिमवृष्टी झाल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट पसरत आहे. काल 27 वर्षानंतर तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं. या थंडीमुळे गहू, हरभरा, मका या पिकांना जरी फायदा असला, तरी कांद्याला तोटा आहे. थंडीमुळे सायंकाळी 6 वाजताच रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत.
जळगावातील चाळीसगाव तालुक्याला गुलाबी थंडीने हुडहुडी भरली आहे. मात्र साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तापमान 7 अंशावर आलं आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढत आहे. रात्री 9 नंतर थंडीमुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात आठवड्यापूर्वी ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा जोर थोडा कमी झाला होता. मात्र चार पाच दिवसांपासून थंडीचा जोर अधिकच वाढला आहे. दरम्यान थंडीत वाढ झाल्याने पहाटेच्यावेळी काही प्रमाणात धुके पडत आहे. याचा भाजीपाला आणि बागायती पिकांना फटका बसण्याचा शक्यता आहे. तर या कडाक्याच्या थंडीमुळे काही पिकांवरील रोगराई कमी होईल.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
पुणे किमान – 13 कमाल- 16
कोल्हापूर
कमाल 29 किमान 14
पालघर कमाल 28 किमान 18
रायगड
कमाल 16
किमान 12
नागपूर –
कमाल – 24 किमान – 9
औरंगाबाद –
कमाल – 25.18 किमान – 10.26
मनमाड कमाल 26 किमान 9
नांदेड
कमाल 26 किमान 8
वाशिम :
कमाल -28.02
किमान-11.05