ठाणे : अरिहंत नावाच्या गादीवर झोपल्यास कोरोनाची लागण होणार नाही, अशी खोटी जाहिरात (Rumours of corona virus) प्रसारित करणाऱ्या गादी विक्रेत्याविरोधात भिवंडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गादी विक्रेत्याने वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसारित करुन लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Rumours of corona virus). स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब डावखरे यांच्या तक्रारीवरुन गादी विक्रेत्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. हा कोरोना राज्यातही धडकला आहे. महाराष्ट्रात 43 जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचं प्रमाण कमी व्हावं किंवा त्याचा नायनाट व्हावा यासाठी सरकार आणि सर्वसामान्य प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन भिवंडीत गादी विक्रेत्याने ‘कोरोनापासून बचाव करणारी गादी’, अशी खोटी जाहीरात करुन लोकांची फसवणूक केली.
या विक्रेत्याचे भिवंडीच्या कशेळी आणि वळ या भागात गादीचं दुकाण आहे. त्याच्या दुकाणाचे नाव ‘अरिहंत मेट्रेस’ असं आहे. या विक्रेत्याने ‘अँटी करोना व्हायरस मेट्रेस’ ही 15 हजार रुपयांची गादी विक्रीस आणली. त्यावर झोपल्यास करोनाचा प्रादुर्भाव होत नाही, अशी फसवी जाहिरात ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकात 13 मार्चच्या अंकात प्रकाशित केली. यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब डावखरे यांनी आक्षेप घेत पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी अरिहंत मेट्रेसचे मालक अमर पारेखच्या विरोधात कलम 505 [2(ब)] सह आपत्ती व्यावस्थापन कायदा 2005 चे कलम 52, औषधी द्रव्य आणि तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियम 1954 चे कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. कोरोनाचा उपचार करणारे कोणतेही औषध अजून बाजारात उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी केलं आहे.