मुंबई : राज्यभरातील पोलीस कोरोनाच्या कचाट्यात सापडत (Police corona positive) आहेत. कारण एका दिवसात तब्बल 38 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 495 वर पोहोचली आहे. यामध्ये 50 अधिकारी आणि 445 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं काल समोर आलं होतं.(Police corona positive)
कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र हेच पोलीस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे आठ अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने चार पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पोलिसांवर हल्ले
एकीकडे पोलिसांना कोरोनाची लागण होत असताना, दुसरीकडे पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाणही वाढलं आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. आतापर्यंत 184 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. या प्रकरणी 663 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
काल तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. आता पर्यंतच्या हल्ल्यात 72 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी आहेत.
95 हजार गुन्हे दाखल
लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यभरात 95 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 18 हजार नागरिकांना अटक झाली आहे. याशिवाय 53 हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून तीन कोटी 51 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना