…म्हणून पोलिसांनी स्वत: जोडप्याचं लग्न पोलीस ठाण्यात लावलं!
पोलीस ठाण्यात नागरिक त्यांच्या समस्या घेऊन जातात आणि पोलीस नेहमी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक आणखी यशस्वी प्रयत्न कानपूरच्या जुही पोलिसांनी केला. या पोलीस ठाण्यात एका प्रेमी जोडप्याचं लग्न लावण्यात आलं
लखनऊ : पोलीस ठाणे म्हटलं की, चोरी, हत्या, फसवणूक, मारहाण, गुन्हेगार इत्यादी सर्व डोळ्यासमोर येतं (Marriage In Police Station). मात्र, याच पोलीस ठाण्यात कधी-कधी काही चांगल्या गोष्टीही घडत असतात. पोलीस ठाण्यात नागरिक त्यांच्या समस्या घेऊन जातात आणि पोलीस नेहमी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. असाच एक आणखी यशस्वी प्रयत्न कानपूरच्या जुही पोलिसांनी केला. या पोलीस ठाण्यात एका प्रेमी जोडप्याचं लग्न लावण्यात आलं (Marriage In Police Station). या लग्नासाठी सर्व तयारी पोलिसांनी केली होती. इतकंच नाही तर पोलिसांनी या जोडप्याच्या कुटुंबियांना बोलावून त्यांना या जोडप्याच्या लग्नासाठी तयार केलं.
कुटुंबियांचा लग्नाला विरोध
कानपूर येथील कँट क्षेत्रात राहुल आणि नैना राहायचे. हे दोघे शेजारी होते. दोन वर्षांपूर्वी यांच्यात प्रेमसंबंध जुळले. मात्र, या दोघांच्याही कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. राहुल आणि नैनाला वाटलं की, त्यांच्या घरचे त्यांच्या लग्नासाठी कधीही होकार देणार नाही. त्यामुळे त्यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर ते त्यांच्या-त्यांच्या घरी राहू लागले. मात्र, आठवड्यापूर्वी नैनाचे कुटुंबीय तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देणार असल्याचं तिला कळालं. त्यानंतर हे दोघेही घरी न सांगता निघून गेले.
मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने नैनाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरु केला. पोलिसांनी या दोघांचाही शोध लावला आणि त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन आले.
नैना आणि राहुल यांची प्रेम कहाणी ऐकल्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या कुटुंबियांना ठाण्यात बोलावलं आणि त्यांना या दोघांच्या लग्नासाठी तयार केलं. अखेर दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी होकार दिला.
त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याच्या लग्नाची तयारी सुरु केली. पोलिसांनी एका पंडीतला बोलावलं आणि पोलीस ठाण्यातील मंदिरात त्यांचं लग्न लावून दिलं. या लग्न सोहळ्यात आजूबाजूच्या परिसरातील लोकांनीही सहभाग घेतला. लग्न लावून दिल्याबद्दल नैना आणि राहुलने पोलिसांचे धन्यवाद मानले.