मुलुंडमध्ये सहा फुटाची मगर, एनजीओकडून मगरीला पकडण्यात यश
मुलुंडमधील स्वप्न नगरी परिसरात सहा फुटांची मगर सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ (Crocodile caught mulund) उडाली.
मुंबई : मुलुंडमधील स्वप्न नगरी परिसरात सहा फुटांची मगर सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ (Crocodile caught mulund) उडाली. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ही मगर सापडताच एनजीओच्या मदतीने या मगरीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. एनजीओच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश (Crocodile caught mulund) आले आहे.
या मगरीला पकडल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर तिला बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. या मगरीला पाहण्यासाठी विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
स्वप्न नगरी परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारत बांधण्याचे काम सुरु आहे. येथे इमारतीच्या बांधाकामासाठी खड्डा खोदण्यात आला. गेल्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. त्यामुळे येथे मगर आली असल्याचे स्थानिक सांगत आहेत.
यापूर्वीही मगर दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पण आज पुन्हा एकदा मगर दिसल्यामुळे पोलिसांना या घटनेची माहिती देत मगरीला पकडण्यात आले आहे.
“गेल्या दीड महिन्यापूर्वी आम्हाला इथल्या स्थानिकांनी मगर दिसल्याची माहिती दिली होती. त्याआधारे वन विभागाच्या मदतीने मगरीला सापळा रचून पकडण्यात आम्हाला यश आले. ही मगर बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सोडली जाईल”, असं रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी सांगितले.