YES बँकेवरील निर्बंधाचा फटका, पिंपरी चिंचवड मनपाचे तब्बल 983 कोटी रुपये अडकले
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर त्याचा थेट फटका पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला देखील बसला आहे.
पुणे : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर त्याचा थेट पिंपरी चिंचवड महानगर पालिकेवरही परिणाम झाला आहे (PCMC fund in YES Bank). एस बँकेमध्ये महापालिकेचे तब्बल 983 कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. भाजपने करदात्यांचे पैसे संकटात टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत एस बँकेमधील पैशांवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. महापालिकेमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर महापालिकेच्या दैनंदिन संकलनाचे पैसे एस बँकेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ऑगस्ट 2018 मध्ये महापालिकेचे तब्बल 1,000 कोटी रुपये एस बँकेत जमा करण्यात आले. त्यातील काही पैसे पालिकेने काढले. त्यानंतरही व्याज धरुन महापालिकेचे तब्बल 983 कोटी रुपये एस बँकेत आहेत. भाजपने राष्ट्रीय बँकेला द्यायला हवे होते असे कर संकलनाचे काम खासगी बँकेला दिले. यातून भाजपने करदात्यांचे पैसे संकटात टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच महापालिकेचे पैसे राष्ट्रीय बँकेत न ठेवता एस बँकेत ठेवण्याचा निर्णय का घेतला? याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.
भाजपने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. भाजपचे गटनेते नामदेव ढाके यांनी विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी ही एस बँकेत पैसे ठेवण्याचा निर्णय योग्य होता असं म्हंटलं आहे. तसेच एस बँकेतील पैसे सुरक्षित असल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. एकूणच काय तर एस बँकेत पैसे ठेवण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातून काय साध्य होणार हा प्रश्न असला तरी किमान करदात्या नागरिकांचे पैसे बुडू नयेत हीच अपेक्षा.
PCMC fund in YES Bank