पिंपरी चिंचवड : ‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन झाले. जुन्नर तालुक्यातील जन्मगाव असलेल्या गायमुख वाडीत आज (6 ऑगस्ट 2020) दुपारी एक वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. (Dainik Punyanagari Founder Editor Baba Shingote Dies)
बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी 7 मार्च 1938 रोजी झाला होता. इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला फळ विक्री, त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरु केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
‘मुंबई चौफेर’ नावाचे सायं दैनिक बाबा शिंगोटे यांनी 1994 मध्ये सुरु केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली.
मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत.
राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दै. पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक श्री मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. परिश्रमांनी एखादा माणूस आपला प्रवास कुठवर नेऊ शकतो, याचे आदर्श उदाहरण म्हणजे बाबा शिंगोटे यांचे आयुष्य. शून्यातून एक व्यापक परिवार उभारण्याचे काम त्यांनी केले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2020
दैनिक पुण्य नगरी समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे याचं दु:खद निधन झाल्याचं वृत्त समजले .मराठी पत्रकारितेतील व्रतस्थ कर्मयोगी मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने आज एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पत्रकारिता क्षेत्रात समर्पित भावनेतून काम
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) August 6, 2020
शून्यातून विश्व निर्माण करणारे पुण्यनगरी वृत्तसमूहाचे संस्थापक – संपादक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तसृष्टीतील एक दृष्टे व्यक्तिमत्व हरवले आहे. वृत्तपत्र वितरक ते संपादक एवढं विश्व उभं करणाऱ्या बाबांचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/nxj48hwGci
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 6, 2020
वृत्तपत्र विक्रेता ते दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक असा प्रवास करून महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांचा परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/mdqxFowCHA
— Raju Shetti (@rajushetti) August 6, 2020
(Dainik Punyanagari Founder Editor Baba Shingote Dies)