रायगड : संकटकाळात प्रवाशांना तातडीने आरोग्य व्यवस्था मिळावी म्हणून सरकारने 108 क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु केली. याची मोठ्या प्रमाणात जाहिरातही केली जाते. मात्र, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अपघात झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांना वारंवार 108 क्रमांकावर कॉल करुनही तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल 6 तासानतंर 108 रुग्णवाहिका आल्याने योग्यवेळी उपचार न मिळाल्यामुळे अखेर अपघातात जखमी युवकाचा तडफडून मृत्यू झाला (Death due to 108 ambulance delay in Raigad).
रायगडमध्ये शनिवारी (20 जून) दुपारच्या सुमारास 24 वर्षीय तरुण रामजी काळू वाघमारे आणि त्याचा मित्र मनोहर नथू जाधव हे विळेकडून आंबिवलीकडे जात होते. त्यावेळी त्यांचा विळेजवळ अपघात झाला. यावेळी त्यांना विळे येथील सामजिक कार्यकर्ते निलेश वांजळे यांनी एका मिनिडोर रिक्षाने दुपारी 4 च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात माणगाव येथे दाखल केले. यावेळी रामजी वाघमारे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्याचा मित्र मनोहर याला किरकोळ मार लागला होता. त्यामुळे त्याच्या मित्राला उपचार करुन घरी सोडण्यात आले. मात्र, रामजीला दुखापत जास्त असल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले.
यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयकडील रुग्णवाहिकेची चौकसी केली तर ती कोविडसाठी राखीव ठेववण्यात आली होती. त्यामुळे 108 क्रमांकावर कॉल करुन रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. परंतू 108 कडून तात्काळ रुग्ण वाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी वांजळे यांनी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. डोईफोडे आणि डॉ. जोशी यांना समजावून सांगितले. अपघाती तरुण आदिवासी गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे खासगी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी सरकारी रुग्णवाहिकेसाठी मार्ग काढण्याची विनंती केली.
यानंतर रुग्णालयातून कोणतीच रुग्णवाहीका भेटत नसल्याने तब्बल 6 तास वारंवार 108 ला कॉल करण्यात आला. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे पर्यवेक्षक डॉ. प्रदिप इंगोले यांनीही 108 चे रायगड जिल्हा व्यवस्थापक किरण गायकवाड यांना वारंवार कॉल करुन विनंती केली. परंतू रात्री 12 च्या सुमारास 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र, जखमी रामजी वाघमारे याला दवाखान्यात नेत असतानाच 15 किमी अंतर पार केले असतानाच त्याचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णाला मृत घोषित करुन रुग्णवाहिका माघारी परतली.
या दरम्यान जखमी युवकाला माणगाव रुग्णालयात दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाजंळे यांनी कर्तव्यावर असणारे डॉ. डोईफोडे आणि डॉ. जोशी यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर उपचाराकरीता निष्काळजीपणा दाखवल्याचा गंभीर आरोप केला. तसेच 108 रुग्ण वाहिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. माझ्या मुलाला रात्री रुग्णवाहिकेत पाठवल्यावर मुलाचा मृत्यू होईपर्यंत रुग्णालयातील डॉक्टर उडवाउडवीची उत्तर देत होती, असा आरोप मृत युवकाच्या आईने केला आहे.
याबाबत 108 सेवेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक किरण गायकवाड यांना विचारले असता त्यांनी घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केली. कोविडसह इतर कॉलवर रुग्णवाहिका असल्याने लवकरात लवकर इतर रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. माणगाव येथे असताना एक रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने आपण दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. याकरता वेळ गेला, तरी लवकरात लवरक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली असा दावा गायकवाड यांनी केला.
जिल्ह्यात 108 सेवेच्या एकूण 23 रुग्णवाहिका आहेत. त्यातील 8 रुग्णवाहिका कोविडसाठी राखीव ठेवूनही गंभीर जखमी रुग्णांकरीता 6 तासानंतर आपतकालीन सेवा उपलब्ध होत आहे. यातून 108 रुग्णसेवेचा ढिसाळ कारभार समोर येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश वांजळे यांनी केला आहे. तसेच याबाबत दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
हेह वाचा :
नवदाम्पत्याकडून कोव्हिड सेंटरला 50 बेड, लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत रुग्ण सेवेसाठी मदत
Death due to 108 ambulance delay in Raigad