मुंबई : “विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर कर. सर्वांना सुखी ठेव. सर्वांना उत्तम आरोग्य दे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात सुबत्ता येऊ दे. महाराष्ट्राला आर्थिक संकटातून बाहेर काढून पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ आम्हा सर्वांना दे…” असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घातलं. अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती बाप्पाला निरोप देताना अजित पवारांनी हे साकडे घातले. (Ajit Pawar said thanks to Ganpati Bhakt Ganeshotsav 2020)
यंदा गणेशोत्सव साधेपणानं, नियमांचं पालन करीत, कोरोनासंसर्ग वाढणार नाही याची काळजी घेत शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा करण्यात आला. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांचे आभार मानले.
आज, अनंत चतुर्दशीनिमित्त श्रीगणेश मूर्तींचं विसर्जन करीत असताना सर्व नियमांचं पालन होईल, कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल, याची दक्षता आपण सर्वांनीच घ्यायची आहे, असं आवाहन नागरिकांना आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 1, 2020
अनंत चतुर्दशीनिमित्त यंदा विसर्जन मिरवणूक न काढता गणेशभक्तांनी आपापल्या घरी विसर्जन केले. तर सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मंडपात किंवा नेमून दिलेल्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं गणेशमूर्तींचं विसर्जन केलं. पुण्यात दरवर्षी तीस तास चालणारी मिरवणूक यंदा टाळण्यात आली. मानाच्या गणेशमंडळांनी यंदा तीन तासात गणेशमूर्तींचं भक्तीभावाने विसर्जन केले.
गणेशभक्तांची ही कृती बुद्धीदेवतेच्या भक्तांना साजेशी होती. मुंबई, पुण्यासह राज्यातील गणेशमंडळांनी सामाजिक जाणिवेतून रक्तदान, प्लाझ्मादान, आरोग्य शिबिरांचं आयोजन करत गणेशोत्सव साजरा केला. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.
तसेच सर्व गणेशभक्तांचे, गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार उपमुख्यमंत्र्यांनी मानले. अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणरायांना निरोप देत असताना गणपती बाप्पांनी पुढच्या वर्षी लवकर यावं, अन् ते येतील, तेव्हा महाराष्ट्र आणि देश कोरोनामुक्त झालेला असेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar said thanks to Ganpati Bhakt Ganeshotsav 2020)
संबंधित बातम्या :