VIDEO | देवेंद्र फडणवीस सौरऊर्जेवरील बाईकने मंचावर
परभणीतील कृषी संजीवनी प्रदर्शनाचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यानंतर सोलर बाईक चालवत ते व्यासपीठाकडे रवाना झाले
परभणी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर ‘धूम स्टाईल’ एन्ट्री घेतली. निमित्त होतं परभणीतील भव्य कृषी संजीवनी महोत्सवाचं. ज्या बाईकवरुन देवेंद्र फडणवीस मंचाच्या दिशेने रवाना झाले, ती होती सोलर बाईक (Devendra Fadnavis Solar Bike).
देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवार 7 फेब्रुवारी) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कै. शेषरावजी भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ पहिल्यांदाच संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
कृषी संजीवनी प्रदर्शनाचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर फडणवीसांनी महोत्सवातील स्टॉल्सना भेटी दिल्या. फेरफटका मारुन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सौरऊर्जेवर चालणारी बाईक दाखवण्यात आली.
सौरऊर्जेवरील बाईक पाहून देवेंद्र फडणवीसांना प्रचंड कौतुक वाटलं. भाषण करण्यासाठी मंचाकडे निघण्यासाठी फडणवीस बाईकवर विराजमान झाले आणि ती चालवतच स्टेजकडे रवाना झाले.
बाईक चालवताना फडणवीसांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते. देवेंद्र फडणवीसांना सौरऊर्जेवरील बाईक चालवताना पाहून उपस्थितही हरखून गेले होते.
VIDEO | देवेंद्र फडणवीस सौरऊर्जेवरील बाईक चालवत मंचावर, परभणीतील कृषी महोत्सवादरम्यान फडणवीस सोलर बाईकवर स्वार @Dev_Fadnavis pic.twitter.com/ByJ7Lx7RkU
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2020
वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी असे पाच दिवस कृषी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी संबंधित प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
या प्रदर्शनात शेतीसाठी उपयुक्त दोनशे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. उद्घाटन प्रसंगी 9 प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महिला बचत गट मेळावा, अशव प्रदर्शन, महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात अभिनेत्री वैशाली जाधव हजर आहेत. सरपंच परिषद, महिला मेळावा अशा विविध कार्यक्रमांची पाच दिवस रेलचेल असणार आहे. (Devendra Fadnavis Solar Bike)
हेही वाचा : फडणवीस पुढचं बजेट मांडण्याची शक्यता, चंद्रकांत पाटील-पंकजा मुंडेंना महाराष्ट्रात नवी जबाबदारी?