फडणवीसांचे मोदींशी घनिष्ठ संबंध, राज्याच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा : संभाजीराजे
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यांनी राज्याच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला खासदार संभाजीराजे यांनी दिला.
बीड : राज्यात शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे राज्याच्या मदतीसाठी फडणवीसांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला खासदार छत्रपती संभाजीराजे(Sambhaji Raje) यांनी दिला. तसेच नुकसानीची तीव्रता मोठी असून शासकीय अधिकारी बांधावर न जाता कार्यालयात बसूनच पंचनामे करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ते बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. (Devendra Fadnavis should take initiative to help the state said Sambhaji Raje)
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिकं आडवी झाली आहेत. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करुन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. बीडमध्ये आले असता त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राज्यात नुकसान जास्त झाले आहे. त्यांनी राज्याच्या मदतीसाठी पुढाकर घ्यावा.” नुकसानीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही त्यांनी बोट ठेवलं. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर पुढारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करत आहेत. ही वेळ एकमेकांवर ताशेरे ओढण्याची नाही तर शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे.”
पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे
छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. सध्याची परिस्थिती बिकट आहे. शेतकरी हतबल आहेत. नुकसानीची तीव्रता मोठी आहे. पण अधिकारी मात्र बांधावर न जाता कार्यालयात बसूनच पंचनामे करत आहे. त्यामुळे शासनाने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच राजकारण्यांविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करताना सरकारने ठोस मदत करावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला सरकार तसेच लोकप्रतिनिधी जबाबदार असतील अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी, अपसिंगा गावातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
संबंधित बातम्या :
‘आमी आत्महत्या करायला तयार हाव… आवं काय, जगावं कसं बगा आमी?’, बळीराजाची व्यथा ऐकून संभाजीराजे हादरले
तुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा : संभाजीराजे
(Devendra Fadnavis should take initiative to help the state said Sambhaji Raje)