मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या ताफ्यातील गाडीला (Convoy Car Accident) लोणावळ्याजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसून मुंडेही सुखरुप आहेत.
धनंजय मुंडे आज (रविवारी) सकाळी मुंबईला जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. लोणावळ्याजवळ तीन गाड्यांची एकत्रित धडक झाली होती.
अपघातग्रस्त गाडीमध्ये धनंजय मुंडे स्वतः नव्हते, तर त्यापुढे असलेल्या दुसऱ्या गाडीमध्ये होते. मुंडे यांना अपघातात कुठलीही इजा झालेली नसून ते सुरक्षितरित्या मुंबईला पोहचले आहेत.
अपघातग्रस्त गाडीमध्ये दोन चालक आणि एक अंगरक्षक होता त्यांच्या हाता-पायाला थोडासा मुका मार लागला. त्यांना गंभीर जखमा झाल्या नसून काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही. त्यांच्यावर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे.