मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) तक्रारीनंतर कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात चांगली व्हॅनिटी व्हॅन बनवून देण्याच्या आमिषाने छाब्रियांनी जवळपास साडेपाच कोटी रुपये उकळल्याचा आरोप कपिल शर्माने केला आहे. छाब्रियांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. (Dilip Chhabria arrested in Kapil Sharma Vanity Van Case)
व्हॅनिटी व्हॅनच्या पार्किंग फीसाठी दिलीप छाब्रिया यांनी एक कोटी उकळल्याची माहिती आहे. कपिल शर्माच्या तक्रारीनंतर मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली असून त्याची चौकशी सुरु होती. फसवणूक झालेले अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत.
कोण आहेत दिलीप छाब्रिया?
दिलीप छाब्रिया हे देशातील सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. सेलिब्रिटी आणि धनाढ्यांच्या कार डिझाईन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅनही दिलीप छाब्रियांनीच डिझाईन केली होती. क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनेही दिलीप छाब्रियांविरोधात 2015 मध्ये तक्रार नोंदवली होती. दिलीप छाब्रियांनी पाच लाख रुपये घेऊनही आपले काम योग्य पद्धतीने न केल्याचा आरोप दिनेश कार्तिकने केला होता.
डिझायनर कार खरेदी-विक्री आणि फायनान्स करुन अनेकांची कोट्यवधींना फसवणूक करण्याच्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज आहे. या गुन्ह्यात दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. दिलीप छाब्रिया डिझाईन्स प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत.
असा रचला सापळा
मुंबईतील नरिमन पॉईंट भागात ट्रायडंट हॉटेलजवळ डी. सी. अवंती गाडी येणार आहे. या गाडीचा नंबर बोगस आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या टीमने 17 डिसेंबरला सापळा रचला होता. मात्र त्या दिवशी गाडी आली नव्हती. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरला कुलाब्यातील ताज हॉटेलजवळ पुन्हा सापळा रचून पोलिसांनी छाब्रियांना पकडलं होतं.
संबंधित बातम्या :
डिझायनर कारप्रेमींना धक्का, मुंबई पोलिसांकडून मोठं रॅकेट उद्ध्वस्त, दिलीप छाब्रियांना बेड्या
कपिल शर्मा मुंबई क्राइम ब्रँचच्या ऑफिसमध्ये, दिलीप छाब्रियांविरोधात जबाब देणार!
(Dilip Chhabria arrested in Kapil Sharma Vanity Van Case)