लखनौ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रोजदांरीवर काम करुन उपजीविका करणाऱ्या मजुरांचे गंभीर प्रश्न तयार झाले आहेत. रोजगारानिमित्त भाडे देऊन राहणाऱ्या मजुरांना दररोजचं जेवण आणि भाडे भरणेही अशक्य होत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या मजुरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही मजुराकडून आणि कर्मचाऱ्याकडून पुढील 1 महिना भाडं मागू नये, असे आदेश नोएडाचे जिल्हाधिकारी बी. एन. सिंह यांनी दिले आहेत (Order to not demand rent amid Corona). जो घरमालक भाडेकरुंकडून भाड्याची मागणी करेल त्यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी बी. एन. सिंह म्हटले आहे, “सर्व घरमालकांनी आपल्या येथे राहणाऱ्या मजूर आणि कामगारा भाडेकरुंकडून भाडं वसूल करु नये. जर कोणत्याही घरमालकाविरोधात जबरदस्ती भाडे मागितल्याची तक्रा आली, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या अंतर्गत 2 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.”
आदेशांचं पालन न करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध कायदा 2005 च्या कलम 51 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यानुसार दोषींना 1 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. आदेशाचं उल्लंघन करताना जर जीवित किंवा वित्तहानी झाली, तर दोषींना 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. हा आदेश केवळ एक महिन्यांसाठी भाडे न मागण्याबाबत आहे. त्यापुढील निर्णय 1 महिन्यानंतर असलेल्या स्थितीवर घेतला जाणार आहे. या निर्णयाने हातावर पोट भरणाऱ्या भाडेकरुंना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अशा स्थितीत गावाकडे जाण्याची नामुष्कीही येणार नाही.
नोएडामधील घरमालकांनी देखील या आदेशाला अनुकुल प्रतिसाद दिला आहे. त्याचं म्हणणं आहे की, “आमच्या 50 खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत. त्यामुळे जर 1-2 महिने भाडं मिळालं नाही, तर आम्हाला पार नुकसान होणार नाही. आम्ही या संकटाच्या काळात देशासोबत आहोत. आम्ही आमच्या भाडेकरुंना घरं सोडून जाऊ नका, असं सांगितलं आहे. जर त्यांना कशाची गरज पडली तर आम्ही त्याची व्यवस्था करु.”
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका नोएडाला बसला आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 50 वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण नोएडामध्ये आहेत. उत्तर प्रदेशमधील 75 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाचं थैमान सुरुच, महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 193 वर
कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला
VIDEO: टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा ‘DSP’ रस्त्यावर, काही वेळातच शहर लॉकडाऊन
संबंधित व्हिडीओ: