सोलापूर एसटीला मोठा दिलासा, प्रवासी उत्पन्नात राज्यात चौथा क्रमांक, तर कार्तिक यात्रेतील खिलार जनावरांचा बाजार रद्द
लॉकडाऊनच्या काळात सोलापूर एसटी विभाग मोठ्या संकटात सापडला होता. एसटी सेवा बंद असल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार थकले. मात्र राज्य सरकारनं अनलॉकची घोषणा केल्यानंतर रस्त्यांवरुन एसटी धावण्यास सुरुवात झाली. दिवाळीच्या काळात सोलापूर विभागाचं दिवसाचं उत्पन्न 60 लाखापर्यंत गेलं आहे.
सोलापूर: आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. पण अनलॉक केल्यानंतर आलेल्या दिवाळीमुळे एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांनी एसटीला भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यामुळे सोलापूर एसटी विभागाला दिवसाला तब्बल 60 लाखापर्यंतचं उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळे प्रवासी उत्पन्नात सोलापूर विभागाचा राज्यात चौथा क्रमांक लागला आहे. (Diwali brings relief to Solapur ST division)
लॉकडाऊनच्या काळात सोलापूर एसटी विभाग मोठ्या संकटात सापडला होता. एसटी सेवा बंद असल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार थकले. मात्र राज्य सरकारनं अनलॉकची घोषणा केल्यानंतर रस्त्यांवरुन एसटी धावण्यास सुरुवात झाली. जवळपास 8 महिने घरात अडकून पडलेल्या लोकांनी दिवाळीनिमित्त गावी जाण्यास पसंती दिली. त्यात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. या काळात सोलापूर विभागाचं दिवसाचं उत्पन्न 60 लाखापर्यंत गेलं.
सोलापूर-होटगी ते कुडगी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण
सोलापूर – होटगी ते कर्नाटकातील कुडगीपर्यंत रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता या मार्गावरुन ताशी 120 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकणार आहे. 2014 -15 मध्ये रेल्वे मंत्रालयानं या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर सुमारे 5 वर्षात 130 किलोमीटर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. हा मार्ग पुढे गदगपर्यंत जोडण्यात येणार आहे.
कार्तिक यात्रेतील जनावरांचा बाजार यंदा नाही
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्या प्रशासनानं कार्तिक एकादशीच्या वारीवरही निर्बंध लादले आहेत. कोरोनामुळे आषाढी वारीला परवानगी देण्यात आली नव्हती. सध्या राज्यात अनलॉक सुरु असलं तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कार्तिक एकादशीच्या वारीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे कार्तिक यात्रेतील खिलार जनावरांचा बाजारही यंदा होणार नाही. या यात्रेनिमित्त दरवर्षी वाखरी इथं जातीवंत खिलार जनावरांचा खरेदी-विक्री बाजार भरत असतो. पण यंदा हा बाजार रद्द करण्याचा निर्णय पंढरपूर बाजार समितीनं घेतला आहे.
वारकरी, दिंड्या आणि पालख्यांना प्रवेश बंदी
राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. यंदाची कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे, मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या:
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, दिंड्या आणि पालख्यांना प्रवेश बंदी
ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश
Anil Parab | एसटीचं खासगीकरण करणार नाही, 6 महिन्यात एसटीचं चित्र बदलेलं : अनिल परब
(Diwali brings relief to Solapur ST division)