यंदा कोरोनामुळे दिवाळी साधेपणाने साजरी केली जात असली तरी दरवर्षीचा उत्साह कायम आहे. (Diwali Festival 2020 Celebration Photos)
Follow us
दिवाळी म्हटलं की जल्लोष, फराळ, शॉपिंग आणि फटाक्यांची आतेशबाजी…यंदा कोरोनामुळे दिवाळी साधेपणाने साजरी केली जात असली तरी दरवर्षीचा उत्साह कायम आहे
संस्कृतमध्ये दिवाळीला दिपावली असेही म्हणतात. कोरोनामुळे बाजरात मंदी असली तरी खरेदीला उधाण आले आहे. मिठाई, कपडे, दागिन्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे
वसुबारस – दिवाळी सणाची खरी सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. वसू म्हणजे धन, बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गोवत्सपूजा करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे गायीला फार महत्त्व दिले जाते. या दिवशी बाजरी आणि गुळ कुटून केलेल्या लाडूंचा नैवद्य गायीला दाखवला जातो.
धनत्रयोदशी – अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी नवीन वस्तू आणि सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनाच्या देवतेची या दिवशी पूजा करतात. तसेच कुटुंबाच्या सुख, समृध्दीसाठी प्रार्थना करतात.
नरक चतुर्दशी – अभ्यंगस्नानाची गडबड आणि फटाक्यांची आतषबाजी यातच नरकचतुर्दशीची मंगल पहाट उजाडते. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. या दिवशी पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरुन अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.
नरक चतुर्दशीदिवशी देवासमोर फराळ तसेच गोडधोड प्रसाद ठेवला जातो. त्यानंतर एकमेकांना फराळ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
लक्ष्मीपूजन – लक्ष्मीपूजन हा दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा दिवस. या दिवशी लक्ष्मी, सरस्वती, गणपती या देवीदेवतांचे पूजन केले जाते.
लक्ष्मीपूजनादिवशी दारात सुंदर दिव्यांची सजावट आणि रांगोळ्याही काढल्या जातात.
बलिप्रतिपदा/पाडवा – लक्ष्मीपूजनानंतर पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला विशेष महत्त्व दिले जाते. पाडव्याच्या दिवशी पती पत्नीला छानशी भेट देतात. हल्ली पती आणि पत्नी दोघेही एकमेकांना भेटी देतात.
भाऊबीज – कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते. भावाच्या सुखसमृद्धीसाठी तसेच त्याच्या भरभराटीसाठी प्रार्थना करते.