DYSP सुरज गुरव मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया: हसन मुश्रीफ
कोल्हापूर: डीवायएसपी सुरज गुरव हे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत, त्यांना मोठ्या मनाने माफ करुया असं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार मुश्रीफ आणि डीवायएसपी सुरज गुरव यांच्यात महापालिकेसमोर शाब्दिक चकमक झाली होती. सुरज गुरव यांनी आमदार मुश्रीफांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं होतंच, शिवाय त्यांना खडे बोल सुनावले […]
कोल्हापूर: डीवायएसपी सुरज गुरव हे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत, त्यांना मोठ्या मनाने माफ करुया असं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार मुश्रीफ आणि डीवायएसपी सुरज गुरव यांच्यात महापालिकेसमोर शाब्दिक चकमक झाली होती. सुरज गुरव यांनी आमदार मुश्रीफांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं होतंच, शिवाय त्यांना खडे बोल सुनावले होते. सुरज गुरव यांच्या बेधडक भूमिकेचं नागरिकांनी कौतुक केलं होतं.
राज्यभरातून गुरव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दुसऱ्या बाजूला गुरव यांच्यावर कारवाई करा अशी मागणी झाली होती. मात्र आता आमदार हसन मुश्रीफ यांनी या वादावर पडदा टाकण्याचं आवाहन केलं. वाचा: हसन मुश्रीफांना भिडणारे DYSP सुरज गुरव कोण?
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी 10 डिसेंबरला निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीमध्ये प्रचंड चुरस होती. राजकीय परिस्थितीमुळे कोल्हापूर परिसरात तणाव होता. या तणावामुळे अनुचित घटना घडण्याचीही शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली होती. निवडणुकीच्या दिवसी महापालिकेला छावणीचं स्वरुप आलं होतं. पोलिसांनी नगरसेवकांव्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत प्रवेश देण्यास नकार दिला होता. मात्र त्याला आक्षेप घेत काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी महापालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे डीवायएसपी सुरज गुरव उपस्थित होते. त्यांनी दोन्ही आमदारांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाली.
आम्ही नोकरी करतोय, राजकारण नाही, असं सुरज गुरव यांनी आमदार मुश्रीफांना सुनावलं.
डीवायएसपी सुरज गुरव काय म्हणाले?
“सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा”, अशा शब्दात कोल्हापूरचे डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना काल सुनावलं. महापालिकेत नगरसेवकांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबत पोलिसांची बाचाबाची झाली.
चांगल्या पोस्टसाठी चमकोगिरी: हसन मुश्रीफ
या बाचाबाचीनंतर हसन मुश्रीफ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. “चांगल्या पोस्टसाठी हे पोलीस अधिकारी चमचेगिरी करतात. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापुरात चहापेक्षा किटली गरम झाली असल्याची पाहायला मिळत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हुज्जत घातली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार” असं हसन मुश्रीफ म्हणाले होते. मात्र आता हसन मुश्रीफ यांनी डीवायएसपी सुरज गुरव हे माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना मोठ्या मनाने माफ करुया असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
VIDEO:
संबंधित बातम्या
नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं
चांगल्या पोस्टसाठी चमचेगिरी, मुश्रीफांचं डीवायएसपींना प्रत्युत्तर