वयाच्या आठव्या वर्षी इयत्ता नववीत प्रवेश, अफाट बुद्धिमत्तेमुळे प्रशासनाचा निर्णय
उत्तर प्रदेशातील आठ वर्षांच्या राष्ट्रम आदित्य श्रीकृष्णला आई-वडिलांनी घरीच प्राथमिक शिक्षण दिलं होतं. त्यानंतर हायस्कूलमध्ये प्रवेशासाठी इयत्ता दहावीचा दाखला मिळवण्याकरता त्यांनी प्रशासनाकडे अर्ज केला.
लखनौ : वयाच्या आठव्या वर्षी सर्वसामान्यपणे मुलं तिसरीत शिकतात. मात्र उत्तर प्रदेशातल्या आठ वर्षांच्या चिमुरड्याला थेट नववीमध्ये प्रवेश मिळाला आहे. प्राथमिक शिक्षण घरी घेतल्यानंतर त्याच्या पालकांनी मुलाला दहावीत प्रवेश देण्यासाठी अर्ज केला होता. त्याची अफाट बुद्धिमत्ता पाहून प्रशासनाने दहावीऐवजी नववीत प्रवेश देण्यास होकार दर्शवला.
वयाच्या चौदाव्या वर्षी इतर मुलं ज्या इयत्तेत शिकतात, तिथे पाच-सहा वर्ष आधीच प्रवेश करण्याची किमया लखनौमधील राष्ट्रम आदित्य श्रीकृष्णने (Rashtram Aditya Sri Krishna) साधली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रम वयाची नऊ वर्ष पूर्ण करेल. मात्र त्याआधीच, बुद्धिमत्तेच्या बळावर त्याची एन्ट्री थेट नववीत होत आहे.
राष्ट्रमच्या पालकांनी त्याला दहावीत प्रवेश मिळावा, यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता. यूपी बोर्डाच्या प्रस्तावानंतर प्रशासनाने त्याला दहावीऐवजी नववीत प्रवेश घेण्यास संमती दिली. राष्ट्रमला इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेताना अडथळा होता तो वय आणि आधीच्या इयत्तांचा अभ्यास न केल्याचा. मात्र राष्ट्रम आता लखनौमधील नख्सासमध्ये असलेल्या एमडी शुक्ला इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेईल.
राष्ट्रम हा रायबरेली रोडवर राहणाऱ्या पवन कुमार आचार्य यांचा मुलगा. त्याचं प्राथमिक शिक्षण कोणत्याही शाळेत नाही, तर घरीच झालं. ‘होम स्कूलिंग’ या संकल्पनेविषयी आता बऱ्याचशा पालकांना माहिती आहे. आपल्या मुलाचं शिक्षण अशाप्रकारे झालं आहे, की तो थेट हायस्कूल परीक्षा देऊ शकेल, असा विश्वास त्याच्या वडिलांना वाटतो.
पवन आचार्य आणि त्यांच्या पत्नीने राष्ट्रमला घरीच विषयवार शिक्षण दिलं. गणित आणि सामाजिक शास्त्रांमध्ये त्याने उत्तम ज्ञान संपादन केल्याचं वडील सांगतात. याशिवाय योग विषयात राष्ट्रमला रुची आहे. हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषा त्याने वयाच्या आठव्या वर्षात काही प्रमाणात अवगत केल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तींना जमणार नाहीत, अशा प्रश्नांची उत्तरं राष्ट्रम क्षणात देतो, असा दावाही त्याच्या वडिलांनी केला.