हनुमान चालीसाचे पठन केले तरी यादीत नाव नाही, भाजपच्या यादीत या पाच महिला चमकल्या
भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती मतदारसंघाच्या नवनीत राणा यांचे नाव नाही. या यादीत महाराष्ट्रातील पाच महिलांचा समावेश आहे.
मुंबई | 13 मार्च 2024 : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर येऊन हनुमान चालींसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा अखेर अपेक्षाभंग झालाय. मनसे पाठोपाठ नवनीत राणा यांनीही मस्जीदीवरील भोंग्याविरोधातील आंदोलनात उडी घेत ठाकरे यांना आव्हान दिले होते. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यानंतर वेळोवेळी भाजपच्या बाजूनेच भूमिका घेतली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नवनीत राणा यांना स्थान देण्यात आलेले नाही. याचवेळी भाजपने राज्यात पाच महिलांना उमेदवारी दिलीय.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या गेल्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्यावर निवडून आल्या. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भाजपच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा नवनीत रण यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. यामुळे नवनीत राणा चर्चेत आल्या होत्या.
लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच नवनीत राणा यांनी आगामी निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढविण्याचे जाहीर केले. मात्र, त्याच्या या अपेक्षांना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खो घातला. अमरावती मतदार संघावर आपला दावा सांगत ‘मोदीजी से बैर नहीं, राणा तेरी खैर नही’, अशी टीका माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केली होती.
आमदार रवी राणा यांनी मात्र भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू असे म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्या कमळावरच लढणार. त्यामध्ये खासदार नवनीत राणा देखील असू शकतील, असं वक्तव्य करून राणा यांच्या दाव्याला बळ दिले होते. परंतु, भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती मतदारसंघाच्या नवनीत राणा यांचे नाव नाही. या यादीत महाराष्ट्रातील पाच महिलांचा समावेश आहे.
बीडमधून पंकजा मुंडे, तर जळगावमध्ये आमदार स्मिता पाटील
पंकजा मुंडे या गेले काही दिवस भाजप नेतृत्वावर नाराज असल्याचा चर्चा होत्या. मात्र, त्यांना बीड येथून लोकसभेची उमेदवारी देऊन पक्षाने त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, जळगाव येथून पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या यादीत दिंडोरीच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार तसेच नंदुरबारच्या खासदार हीना गावित यांच्या नावाचा समावेश आहे.
रावेरमध्ये सासरे विरुद्ध सून लढत ?
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र, अजित पवार आणि शरद पवार असे राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर खडसे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शरद पवार गटाकडून लोकसभेची तयारी खडसे यांनी केली आहे. त्यामुळे येथे सासरे विरुद्ध सुनबाई अशा लढतीची शक्यता आहे.